भरधाव कारने रिक्षाला उडविले; तीन चिमुकल्यांसह सात जण जखमी
औरंगाबाद- नाशिक महामार्गावरील मिटमिटा येथे अपघात
औरंगाबाद : औरंगाबाद- नाशिक महामार्गावरील मिटमिटा येथे भरधाव वेगात असलेल्या कारने रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षामधील सात जण जखमी झाले. जखमींमध्ये तीन चिमुकल्याचा समावेश आहे. आज सकाळी औरंगाबाद- नाशिक महामार्गावरील मिटमिटा येथे ‘फौजी ढाबा’ च्या जवळ अपघात झाला.
या अपघात प्रकरणी जखमींनी दिलेली अधिक माहिती अशी की, पवार परिवार वेरूळ येथे जखमी कल्पना यांच्या नातेवाईकांचा घरी रिक्षाने जात होते. घराकडून रिक्षा निघताच मुख्य रस्त्यावर वळण घेत असतानाच भरधाव वेगात आलेल्या इंडिका कारने त्यांच्या रिक्षाला जोराची धडक दिली. दरम्यान, रिक्षा पलटी झाली. या अपघातात रिक्षामधील सर्व सात जण जखमी होऊन रिक्षात अडकले होते सचिन थोरात (वय-33),बाळू पवार (वय-40), कल्पना पवार (वय-30), स्वराज पवार,( वय-1), युवराज पवार (वय-अडीच वर्षे) गौरी पवार (वय-8),विलास गंगाधर पवार (वय-55) (सर्व राहणार पडेगाव),असे अपघातात जखमी झालेल्या ची नावे आहेत. ही घटना शिवसैनिक किसन कनिसे व त्यांच्या मित्रांनी पहिली व तातडीने अडकलेल्या जखमींना बाहेर काढून 108 रुग्णवाहिकेला फोन केला. डॉक्टर अवकाश घायतडक, चालक नागेश्वर सूर्यवंशी यांनी स्थनिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात दाखल केले. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. या अपघातप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.