कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशातील शेतकरी रस्त्यावर उतरणार

शेतकरी संघटनांकडून आज देशात 'भारत बंद'चे आवाहन

0

नवी दिल्ली : संसदेत  पारित केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी संघटनांकडून आज देशात ‘भारत बंद’चा नारा देण्यात आला आहे. या विरोध प्रदर्शनात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याशिवाय देशातील 31 शेतकरी संघटनांनी या बंदला समर्थन दिले आहे.

विविध शेतकरी संघटनांची ‘अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती’, ‘अखिल भारतीय शेतकरी संघटना’, ‘भारतीय किसान संघटना’, ‘अखिल भारतीय किसान महासंघ’ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेससह 10 कामगार संघटनांनीही भारत बंदला पाठिंबा दिला आहे. कृषी विधेयकाविरोधात हरियाणा आणि पंजाब राज्यात पूर्ण शटडाऊन करण्यात आले आहे. तर पंजाबमध्ये शेतकरी रेल रोको आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांच्या या भारत बंदला काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. कृषी विधेयकाविरोधातील भारत बंदला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असे भारतीय शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे. पंजाबमध्ये या विधेयकाचा आधीपासूनच विरोध सुरू आहे. भारतीय शेतकरी संघटनेचे महासचिव सुखदेव सिंह यांनी पंजाबच्या दुकानदारांना आवाहन केलं आहे की, त्यांनी ‘भारत बंद’ला त्यांची दुकाने बंद ठेवावी आणि शेतकऱ्यांचे समर्थन करावे. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या या बंदला काँग्रेस पक्षाने पूर्ण समर्थन दर्शवले आहे. शुक्रवारी ‘भारत बंद’मध्ये आमचे लाखो कार्यकर्ते शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सहभागी होतील, असे काँग्रेसने सांगितले. “शेतकरी संपूर्ण देशाचे पोट भरतात, पण मोदी सरकार शेतकऱ्यांच्या शेतीवर हल्ला चढवत आहे”, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केली. “काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी भारत बंदमध्ये शेतकऱ्यांसोबत उभे आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आंदोलन आणि विरोध प्रदर्शनात सहभागी होतील. काँग्रेस पक्ष शुक्रवारी प्रत्येक राज्यात विरोध मार्च काढणार आहे. त्यानंतर 28 सप्टेंबरला प्रत्येक राज्याच्या राज्यपालांना याबाबत एक पत्र पाठविण्यात येईल”, असे ट्वीटही त्यांनी केली. ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’नेही भारत बंद पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंजूर केलल्या बिलांच्या प्रतिकात्मक होळी करण्याचे आवाहन केले आहे. हे आंदोलन कलेक्टर ऑफिस, तहसीलदार ऑफिस समोर संपूर्ण राज्यभरात करण्याचं आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. कृषी विधेयकाविरोधात महाराष्ट्रातील परभणीतही विरोध करण्यात आला. येथे मशाल रॅली काढत केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्याचं सांगून रद्द करण्याची मागणी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांची आहे. दुसरीकडे भाजपने कृषी विधेयकं शेतकऱ्यांच्याच बाजूनं असल्याचा दावा केलाय. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना देशात कोणत्याही राज्यात शेतमाल विकता येणार आहे. बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या चक्रातून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. शेतकऱ्यांना खरेदीदारासोबत 5 वर्षांसाठी शेतमालाचा करार करता येणार आहे. शेतकरी बंधनमुक्त होईल आणि कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढेल. पण यामुळे शेतीमालाला MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत मिळणार नसल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.