वरिष्ठांच्या आदेशावरूनच बच्चू कडूंना नागपुरात रोखले; मात्र आदेश देणारे वरिष्ठ कोण?
बच्चू कडू थांबलेल्या विश्रामगृहाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात
नागपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज मुंबईत रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पण बच्चू कडू यांना पोलिसांनी नागपुरातच रोखून धरले आहे. महत्वाची बाब म्हणजे बच्चू कडू यांना वरिष्ठांच्या आदेशानुसारच अडवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हा आदेश देणारे वरिष्ठ कोण? असा प्रश्न निर्माण होतो.
बच्चू कडू थांबलेल्या विश्रामगृहाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी 9 वाजताच्या विमानाने बच्चू कडू मुंबईला रवाना होणार होते. त्यांना विमानतळावर सोडण्यासाठी त्यांची गाडीही तयार होती. पण पोलिसांनी त्यांना विश्रामगृहाच्या दारातच अडवून धरले. नागपूर पोलिसांनी अडवल्यानंतर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून दुसऱ्या विमानाने मुंबईला रवाना होण्याबाबत विचारणा करणार असल्याचे कडू यांनी सांगितले. आमच्या आंदोलनामुळे दिल्लीतील आंदोलनावर काही विपरित परिणाम होऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असावी, त्यामुळे आपल्याला येथे रोखले जात असल्याचे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
मोदी-शाह अंबानींचे ऐकतात- कडू
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे अंबानींचे ऐकतात म्हणून रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. रिलायन्स कार्यालयात अंबानींना भेटण्यासाठी जात आहे. रिलायन्स कार्यालया बाहेरील हे आंदोलन आज संपेल की जास्त चालेल हे सांगता येत नसल्याचेही बच्चू कडू म्हणाले. या आंदोलनात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढावही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्याशी रिलायन्स कंपनीचा काही संबंध नसल्याचे कंपनी आणि सरकारकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या 26 दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अशांततेकडे जाण्याची शक्यता बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. तसेच दिल्लीतील आंदोलन वर्षभरही चालू शकते, असेही बच्चू कडू म्हणाले. दरम्यान, बच्चू कडू हे आपल्या कार्यकर्त्यांसह दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दुचाकीवर गेले होते. त्यावेळी त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धरले होते.
“रावसाहेब दानवे यांचे म्हणणे दुर्दैवी आहे. त्यांचा डीएनए एकदा चेक करावा लागेल. त्यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे; की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल,” अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी केली आहे. दिल्लीतील आंदोलनामागे पाकिस्तानचा हात असल्याचे वक्तव्य दानवे यांनी केले होते. त्यावरुन बच्चू कडू यांना दानवेंचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान, कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेच्या वतीने औरंगाबादेत रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी ‘प्रहार’ संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दानवे यांच्या घरासमोर रक्तदान करुन आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या घरासमोर बसून घोषणाबाजी केली.