बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम ‘जैसे थे’ठेवा, औरंगाबाद खंडपीठाचे तूर्तास आदेश
न्यायालयाने कामाची केली पाहणी; अहवाल देण्याचे दिले आदेश, त्यानंंतर औरंगाबाद खंडपीठ पुढील देणार निर्णय
औरंगाबाद :स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम तूर्तास ‘जैसे थे’ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. औरंगाबादेतील महात्मा गांधी कॅम्पसमधील प्रियदर्शनी उद्यानामधील अनेक झाडे तोडून स्मारक उभे करण्याची योजना आहे.
औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील देशमुख आणि न्यायमूर्ती आहुजा यांनी दिले आहेत. प्रियदर्शनी उद्यानातील झाडे तोडून स्मारक उभे करण्याच्या योजनेला अनेक पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला होता. प्रियदर्शनी बचाव मोहीम सुरू करण्यात आली होती. याची दखल घेत न्यायालयाने कामाची पाहणी केली आणि अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. अहवालानंतर औरंगाबाद खंडपीठ पुढील निर्णय देणार आहे. प्रियदर्शनी उद्यानातील 1215 झाडे गेली कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी याआधी जनहित याचिका दाखल केलेली होती. बांधकाम करत असताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. परंतु याचे पुनर्रोपण केले जात नसल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयीची माहिती
प्रकल्पाचा एकूण खर्च – 64 कोटी
उद्यानाचा परिसर – 17 एकर
पुतळ्यासाठी जागा – 1 हजार 135 चौरस मीटर
फूड पार्कसाठी जागा – 2 हजार 330 चौरस मीटर
म्युझियमसाठी जागा – 2 हजार 600 चौरस मीटर
ओपन एअर स्पेस – 3 हजार 690 चौरस मीटर
प्रियदर्शनी उद्यानातील झाडे कधी-कशी कमी झाली?
12 जानेवारी 2016 – उद्यानात 9 हजार 885 झाडांची नोंद
30 नोव्हेंबर 2019 – उद्यानात 8 हजार 970 झाडांची नोंद
कमी झालेल्या झाडांची संख्या – 1 हजार 225 झाडे.
उद्धव ठाकरेंकडून घोषणा
2025 साली बाळासाहेबांच्या प्रखर राष्ट्रवादी ज्वलंत हिंदुत्वाची प्रेरणा देणारे स्मारक उभारणार आहोत, हिंदुत्ववादी म्हणजे राष्ट्रीयत्व सांगणारे हे स्मारक असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डिसेंबर २०२० मध्ये केली होती. ज्यांची ओळख रिमोट कंट्रोल म्हणून होती, त्यांच्या स्मारकाचे उद्घाटन रिमोट कंट्रोलनेच होणे हा योगायोग आहे. या स्मारकात नुसता पुतळा नसेल तर या स्मारकातून अनेकांना हिंदुत्वाची प्रेरणा मिळेल, असे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. दरम्यान, आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडला वृक्षतोडीवरून स्थगिती देणाऱ्या शिवसेनेवर दुटप्पीपणाचा आरोप करण्यात आला आहे. औरंगाबादमधील 17 एकरचे प्रियदर्शिनी उद्यान आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या औरंगाबाद महापालिकेत या परिसरातील झाडांची कत्तल झाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत