सरपंचपदाचा लिलाव कोट्यवधी रुपयांत, निवडणूक आयोगांकडून ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द

या गावांच्या ग्रामपंचायत निवडणूक रद्द,  नाशिकमधील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबारचे खोंडामळी

0

मुंबई :  नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच आणि सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

“उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच आणि सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर आयोगाकडे तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने आयोगाने अहवाल मागविले होते. जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिचित्रफितींचे अवलोकन केल्यानंतर या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे”, असे मदान यांनी सांगितले.

“खोंडामळी येथील लिलावाप्रकरणी आधीच नंदुरबार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता अधिक तपास करून भारतीय दंड विधानाचे कलम 171 (क) अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिक आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली.“केवळ काही ग्रामस्थांच्या एकतर्फी दबावात्मक निर्णयामुळे इच्छूक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढविण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या दोन्ही गावांमध्ये झाला आहे. यातून लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचे आणि आचारसंहितेचे भंग झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी प्राप्त होऊ शकत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे”, असेही मदान यांनी सांगितले.

लिलावाची रक्कम ग्रामदेवतेच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरण्याचा निर्णय

नाशिकच्या उमराणे गावात सरपंचपदाचा लिलाव करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा लिलाव थोड्या थोडक्या नव्हे तर 2 कोटी 5 लाख रुपयांत करण्यात आला. लिलावात जमा झालेली रक्कम गावातल्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरली जाणार असल्याने उमराणे ग्रामस्थांच्या या अनोख्या लिलावाची जोरदार चर्चा होती. गावातील प्राचीन रामेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या सात वर्षांपासून बंद असून, मंदिराची वार्षिक सभा बोलवण्यात आली होती. त्या सभेत सर्व पक्षाचे नेते, गावातील ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होते. त्या सभेत असे ठरवण्यात आले की, मंदिराच्या उरलेल्या कामासाठी सुमारे 2 कोटी रुपये लागणार असून, ते पैसे गावातून जमा करायचे आहेत. त्यासाठी कोणीतरी जबाबदारी स्वीकारावी, या बदल्यात निवडणुकीसाठी उभे ठाकणारे जे सदस्य आर्थिक मदत करतील, त्यांनाच मतदान केले जाईल. याशिवाय सर्वाधिक निधी देणाऱ्या उमेदवाराला सरपंचपदाचा मान देखील मिळणार. ग्रामपंचायत निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना मतदानाच्या दिवशी कुठे दारू, कुठे पार्टी, कुठे पैसे वाटले जातील. हा खर्च टाळून गावात किमान ग्रामदैवतेचे मंदिर उभे राहील, यादृष्टीने ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयावर अनेक स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.