औरंगाबादमध्ये चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला
औरंगाबादच्या वडगाव कोल्हाटी भागात घडली ही घटना
औरंगाबाद : महाराष्ट्रातही महिला सुरक्षित नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, औरंगाबादमध्ये बलात्काराची अत्यंत धक्कादायक घटना घडली. अवघ्या सात वर्षांच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला आहे. सगळ्यात भयंकर म्हणजे नराधम आरोपीने पीडितेच्या ओठांचा चावा घेतल्याने मुलीचा ओठ तुटल्याची माहिती समोर येत आहे.
औरंगाबादच्या वडगाव कोल्हाटी भागात ही घटना घडली. सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी तिने रोखण्याचा प्रयत्न केला असता, नराधमाने तिच्या ओठाचा चावा घेतला. यामध्ये चिमुकलीचा ओठ तुटल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पीडित मुलीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध घेतला असता, नराधम फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, लहानवयात असा धक्कादायक प्रकार घडल्याने पीडितेला धक्का बसला आहे. तर आरोपीचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही. कुठल्याही क्षेत्रातच काय तर हल्ली मुली घरातही सुरक्षित नसल्याची अनेक प्रकरणे समोर आली. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर यावर प्रशासनाने ठोस पाऊल उचलले पाहिजे, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.