आष्टीत बँक व्यवस्थापकाची शेतकऱ्यांना अरेरावी, निलंबनासाठी शेतकरी संतप्त
आष्टीत बँक शाखाधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी
आष्टी (बीड) : कर्जप्रकरणात विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना अरेरावी करून उडवाउडवीचीी उत्तरेदेत सुरक्षारक्षकाडून बँक शाखेबाहेर हाकलणाऱ्या स्टेट बँक शाखाधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.23) रोजी तहसीलदारांकडे केली आहे.
कर्जप्रकरणात चौकशीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना अरेरावी करून उडवाउडवीची उत्तरे देऊन सुरक्षारक्षकाकडून बँक शाखेबाहेर हाकलणाऱ्या स्टेट बँक शाखाधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.23) रोजी तहसीलदारांकडे केली. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना साथरोग व ओल्या दुष्काळामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पीककर्ज व शेतीकामासाठी शेतकरी आष्टी शहरातील स्टेशन रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया या बँक शाखेत मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. बँकेत दाखल केलेल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी बँकेत वारंवार हेलपाटे मारून विचारणा करीत आहेत. मात्र, पीककर्ज नवे-जुने करून तीन-चार महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जरक्कम जमा झालेली नाही. बँकेत दाखल केलेल्या कर्ज प्रकरणाची रक्कम कधी जममा होईल, याची चौकशी करण्यासाठी विभागात गेलेल्या शेतकऱ्यांना शाखाधिकारी यांच्याकडून अरेरावीची भाषा वापरण्यात येत असून, उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत, असा आरोप निवेदनात करण्यात आला. त्यामुळे शाखाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे; अन्यथा शनिवारी (ता.28) रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवक्रांती युवा संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर मुनीर बेग (डोईठाण), दादासाहेब गर्जे (हातोला), दत्तात्रय तावरे (खानापूर), बाबासाहेब खामकर(हातोला), नवनाथ काळे, सोमनाथ काळे (जोगेश्वरी पारगाव) या शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.