हर्सूल तुरुंगातून शिक्षा भाेगून सुटताच, आरोपीने केला मैत्रिणीचा बर्थडे

भररस्त्यावर खुनी गुंडासोबत पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीचे बेधुंद नशेत नृत्य

0

औरंगाबाद  : पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीने  खुनी गुंडासोबत मध्यरात्री भररस्त्यावर नशेत बेधुंद  होऊन नृत्य केले . कुख्यात गुंड शेख जावेद शेख मकसूद ऊर्फ टिप्या एक वर्षाची शिक्षा भाेगून हर्सूल कारागृहातून बाहेर आला. त्याचदिवशी मैत्रिणीच्या वाढदिवसाचे साजरा करण्याच्या नावाखाली त्याने तिच्यासाेबत मध्यरात्री पुंडलिकनगरच्या रस्त्यावर हाती बिअरची बाटली, सिगारेट घेऊन व कर्णकर्कश आवाजात गाणे लावून कारच्या बाेनेटवर चढून अगदी सिनेस्टाइल धांगडधिंगा केला.

कुख्यात गुंड शेख जावेद शेख मकसूद ऊर्फ टिप्या एक वर्षाची शिक्षा भाेगून हर्सूल कारागृहातून बाहेर येताच. ४ ऑक्टोबर रोजी त्याच्या मैत्रिणीचा वाढदिवस हाेता. ताे साजरा करण्यासाठी टिप्या गँगने भररस्त्यावर पार्टी आयोजित केली. कारचे चारही दरवाजे उघडे करून मोठ्या आवाजात गाणे लावले. दारूच्या नशेत तर्रर असलेली तरुणी कारवर चढली. तिच्यापाठोपाठ टिप्या कारवर चढला व बेतालपणे हातात दारूच्या बाटल्या, सिगारेट ओढत दाेघेही कारच्या बाेनेटवर नाचत होते. पुंडलिकनगर, गारखेडा भागात  कुख्यात गुंड शेख जावेद शेख मकसूद याची दहशत आहे. दहशतीमुळे त्यांना  कोणी राेखण्याची हिंमत केली नाही. मात्र मागील दोन दिवसांमध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला. मग पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी टिप्यासह साथीदार मनोज बळीराम जाधव (३६) याला अटक केली. तसेच मैत्रिणीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला.  विशेष म्हणजे टिप्याची ही मैत्रीण दुसऱ्या जिल्ह्यातील पाेलिस अधिकाऱ्याची मुलगी आहे. टिप्यासारखा कुख्यात गुंडासाेबत नाचणारी एका पोलिस अधिकाऱ्याची सुशिक्षित मुलगी असल्याचे समाेर आले. दहा दिवसांपूर्वी तिनेच क्रांती चौकात मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला होता. पोलिसांनी तिलाही ताब्यात घेतले. दारूची झिंग उतरल्यावर पोलिस अधिकाऱ्याची मुलगी असल्याचे समजल्यावर तिला समज देऊन सोडून देण्यात आले.

टिप्याने चौकशीत सांगितल्यानुसार, त्याच्या मित्रांच्या माध्यमातून त्याची व तिची ओळख झाली. बाहेरगावी असलेल्या आई-वडिलांसोबत पटत नसल्याने ती औरंगाबादेत राहत असल्याचे समोर आले आहे. टिप्यावर आतापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार, खंडणी, विनयभंग असे २० हून अधिक गंभीर गुन्हे आहेत. पाेलिस टिप्याला अटक करायला गेले तेव्हा त्याच्या कमरेला तलवार व चाकू हाेता. ताे कायम पिस्टल बाळगताे. अटकेनंतर त्याला पाेलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्तांसमाेर हजर केले. टिप्यावर चार जणांच्या खुनाचे आराेप आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये दुचाकीला साइड न दिल्याच्या किरकाेळ कारणावरून त्याने चाकूने भाेसकून एक खून केला. सप्टेंबर २०१९ मध्ये सततच्या गंभीर गुन्ह्यांमुळे एमपीडीएअंतर्गत हर्सूल कारागृहात त्याला एका वर्षासाठी स्थानबद्ध केले. सप्टेंबर २०२० मध्ये तो कारागृहातून बाहेर आला. काही दिवसांपूर्वी एका दुकानातून फुकट मोबाइल घेऊन गेला. परिसरातील अनेक बारमध्ये ताे पैसे न देता सर्रास दारू ढाेसताे, पार्ट्या करताे. तरीही त्याच्याविरोधात कुणीही तक्रार द्यायला पुढे येत नाही. काही स्थानिक बड्या व्यापारी, बारचालकांनी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनीच आता टिप्यासंदर्भात कठोर कारवाई करून कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.