अलिबाग : ‘रिपब्लिक वृत्तवाहिनी’चे संपादक अर्णव गोस्वामी यांचा पोलिसांकडून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
अर्णब गोस्वामी यांनी दुपारच्या सत्रात अलिबाग पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचे आरोप केले होते. यामध्ये माझ्या हाताला आणि पाठीला दुखापत झाल्याचेही अर्णव गोस्वामी यांनी म्हटले होते. मात्र, न्यायालयाने व्हिडीओ क्लीप आणि वैद्यकीय चाचणीचा अहवाल ग्राह्य धरत अर्णव गोस्वामी यांचे हे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे आता अर्णव गोस्वामी यांची पोलिस कोठडीत रवानगी होण्याची शक्यता वाढली आहे. तत्पूर्वी पोलिसांकडून अर्णव गोस्वामी यांची पत्नी आणि मुलाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा या दोघांवर आरोप ठेवण्यात आला आहे. आज सकाळी रायगड पोलिसांचे पथक अर्णवच्या घरी त्याला अटक करण्यासाठी गेले होत. त्यावेळी अर्णवला अटक करत असताना त्याची पत्नी आणि मुलाने पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्याला घेऊन जाऊ देत नव्हते. अर्णवला घेऊन जाण्यास त्यांनी मज्जाव केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या दोघांनाही केव्हाही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.