उदरनिर्वाहाच्या चिंताग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

0

हिंगोली : वसमतमधील म्हातारगाव येथे अल्पभूधारक शेतकऱ्याने हाताला काम नसल्याने उदरनिर्वाह कसा करावा, या चिंतेमुळे रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथे संघपाल बापूराव दातार (२७) यांचा आई, वडील, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार असून घरी असलेल्या ३ एकर शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालताे. त्यामुळे शेतीकामे आटोपल्यानंतर ते रोजमजुरीने कामालाही जातात. मात्र या वर्षी सतत लागून राहिलेल्या पावसामुळे शेतीची कामे राहिली नाहीत. शिवाय कोविडमुळे लहान-मोठे उद्योग बंद असल्याने हाताला काम मिळाले नाही. त्यामुळे आता उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. शेती पिकाचे नुकसान तसेच हाताला काम नसल्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. दरम्यान, शनिवारी ते जवळा खंदारबन येथे त्यांच्या नातेवाइकांकडे गेले होते. त्यानंतर ते परत आलेच नाही. त्यांचा मृतदेह पिंपळाचौरे गावाजवळ रेल्वेमार्गावर आढळला. याप्रकरणी अरुण दातार यांनी दिलेल्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, जमादार कासले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. जमादार कासले पुढील तपास करीत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.