अनिल परबांचा गृहखात्यात हस्तक्षेप, देशमुखांची थेट तक्रार, पवारांकडून मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त

शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे शरद पवार प्रचंड नाराज असल्याची माहिती

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभारात शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे शरद पवार प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच ही गोष्ट शरद पवार यांच्या कानावर घातली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा मुद्दा मांडल्याचे समजते.

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढलेल्या आदेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली होती. अखेर शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची समजूत काढली होती. या काळात गृहखात्यातील अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका अनिल परब यांच्या बंगल्यावर पार पडल्याचे समजते.मात्र, आता अंबानी स्फोटक प्रकरणातील सचिन वाझेंच्या कथित सहभागानंतर अनिल देशमुख यांच्याकडून पुन्हा एकदा अनिल परब यांच्या गृहखात्यातील हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनिल देशमुखांच्या प्रगती पुस्तकावर मुख्यमंत्री शेरा देतील : संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. एका एपीआयमुळे महाराष्ट्राचे सरकार अस्थिर होणार नाही. चंद्रशेखर यांचे दिल्लीतील सरकार दोन हवालदारांमुळे कोसळले होते, मात्र महाराष्ट्रात तसे काही होणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. ते दिल्लीत बोलत होते. संजय राऊत म्हणाले, “एका एपीआयवरुन काय घडामोडी घडणार? काल याबाबत शरद पवारांनीही सांगितले. महाराष्ट्राचे सरकार स्थिर आहे. चंद्रशेखर आझादांचे सरकार दोन हवालदारांनी पाडले होते. दिल्लीत दारात उभे राहिलेल्या हवालदारांमुळे सरकार कोसळले होते. तसे महाराष्ट्रात सरकार अस्थिर झाले, या भ्रमातून बाहेर पडायला हवे”मनसुख हिरेन आणि अंबानींच्या घराबाहेरील तपासाबाबत एनआयए, एटीएस तपास करत आहेत. केंद्रीय यंत्रणा तपास करत असताना हस्तक्षेप करण्यात अर्थ नाही. मात्र आमचे तपासावर लक्ष आहे, असे संजय राऊत यांनी नमूद केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.