अंबड पोलिसांची कारवाई; रवाना शेतशिवारात 71 किलो गांजा जप्त
अंबड पोलिसांना शेतातील कपाशीच्या पिकात गांजाची झाडे असल्याची मिळाली माहिती
अंबड : जालना तालुक्यातील घनसावंगीच्या रवाना येथील शेतशिवारातील शेतकरी गुलाबराव भगवानराव माने यांच्या शेतात कपाशीच्या पिकात गांजाची झाडे लावल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंबड पोलिसांनी रवाना शेत शिवाारात धाड टाकून कारवाई करून 71 किलो गांजाची झाडे जप्त केली
घनसावंगीच्या रवाना येथील शेतशिवारातील शेतकरी गुलाबराव भगवानराव माने यांच्या शेतात कपाशीच्या पिकात गांजाची झाडे लावल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती. अंबड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी या घटनेवर लक्ष केंद्रीत केले, त्यांनी पोलिस पथकासह रवाना येथील शेतकरी गुलाबराव माने यांच्या शेतात पोलिसांनी शनिवारी (ता.28) दुपारी धाड टाकली. यावेळी कपाशीच्या पिकात असलेल्या तुरीच्या रांगामध्ये लावलेली 58 गांजाची झाडे आढळली. तसेच त्या ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या कापसाच्या गंजीत साठवून ठेवलेला दोन गोण्यातील साडेतीन किलो गांजा आढळून आला. तसेच कारवाई दरम्यान ओला गांजा 68 किलो व वाळलेला गांजा साडेतीन किलो, असा एकूण 71 किलो 500 ग्रॅम गांजा अंबड पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, पोलिस कर्मचारी नारायण शेळके, विष्णू चव्हाण, सतीश देशमुख, महेंद्र गायके, जाधव यांच्या पथकाने केली . यातील संशयित गुलाबराव माने यांना पोलिसानी ताब्यात घेतले असून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.