कोरोना पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा साधेपणाने
मोजके भाविक, ठराविक पुजारी आणि मंदिर समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे अद्याप बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील प्रमुख मंदिरांनी नवरात्रोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तुळजाभवानी, अंबाबाई, सप्तश्रृंगी, रेणुका देवीचा उत्सव साध्या पद्धतीने पार पडला.
काल अष्टमीनिमित्त कोल्हापुरात अंबाबाईची नगरप्रदक्षिणा पार पडली. अष्टमीला अंबाबाई शहरवासियांच्या भेटीसाठी बाहेर पडते, अशी अख्यायिका आहे. ही परंपरा यंदाही जपण्यात आली. करवीर निवासिनी अंबाबाईच्या पालखीची दरवर्षी अष्टमीला नगरप्रदक्षिणा होते. यावेळी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. पालखी मार्गात आकर्षक रांगोळी, विद्यूत रोषणाई केली जाते. भालदार, चोपदारांसह शाही लवाजम्यात ही नगरप्रदक्षिणा पार पडते. यंदा मात्र एका सजवलेल्या ट्रॅक्टरमधून देवीच्या पालखीची प्रदक्षिणा पार पाडण्यात आली. ठराविक श्रीपूजक, देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि मोजके भाविक असं मर्यादित स्वरुप यंदाच्या नगरप्रदक्षिणेला होतं. भाविकांनी गर्दी करु नये म्हणून पालखी मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी राज्यातील साडे तीन शक्तिपीठांनी यंदा साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, वणीची सप्तश्रृंगी आणि माहुरच्या रेणुकादेवी मंदिर समितीने घेतला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडूनही मोठी खबरदारी घेण्यात आली होती. दरवर्षी परंपरेनुसार होणाऱ्या रितीरिवाजांना फाटा देत यंदा मंदिर समितीकडून अत्यंत साधेपणाने पूजा-अर्चा करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वसामान्य नागरिकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही.