राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
कल्याणराव काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा शेतकऱ्याला सल्ला
सोलापूर : राज्यातील सहकारी साखर कारखाने नेहमीच कधी थकबाकी, तर कधी एफआरपीच्या नावाखाली चर्चेत असतात. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये अजित पवार यांनी एफआरपी थकवणाऱ्यांविरोधात थेट गुन्हा दाखल करण्याचा सल्ला शेतकऱ्याला दिला आहे. या ऑडिओ क्लिपनुसार, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजप नेते कल्याणराव काळे यांची एका शेतकऱ्याने अजितदादांकडे तक्रार केली. यावेळी त्या शेतकऱ्याला हा सल्ला दिला. अजित पवार यांच्या या सल्ल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून सोलापूर जिल्हा तसेच सहकार विश्वात खळबळ उडाली
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील विशाल चव्हाण या शेतकऱ्याने अजित पवार यांना चंद्रभागा कारखान्यातील थकबाकीबद्दल कॉल लावला होता. त्यावळेस अजित पवार यांनी शेतकऱ्यांला हा सल्ला दिला. भाजप नेते कल्याणराव काळे हे विठ्ठल परिवाराचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्याकडे पंढरपूर तालुक्यातील दोन सहकारी साखर कारखाने आहेत. गेल्या हंगामापासून हे दोन्ही साखर कारखाने बंद आहे. कारखानेच बंद असल्याने पंढरपूर, माळशिरस तालुका कार्यक्षेत्रतील शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कमही मागच्या दोन वर्षांंपासून थकली आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील विशाल चव्हाण या शेतकऱ्याने अजित पवार यांना फोन करुन कल्याणराव काळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच चंद्रभागा साखर कारखान्याने थकवलेली रक्कम लवकरात लवकर देण्यासाठीही प्रयत्न करण्याची विनंती केली. त्यावेळी, जर शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम थकलेली असेल तर कल्याणराव काळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असा सल्ला या कथित ऑडिओ क्लिपमध्ये अजित पवार यांनी दिला. दरम्यान, राज्य सरकारने 24 सप्टेंबरला एकूण 32 साखर कारखान्यांना तब्बल 392 कोटी थकहमी देण्याचा निर्णय घेतला. एकीकडे साखर कारखान्यांना थकहमी द्यायची. तर दुसरीकरडे भाजप नेत्यांच्या साखऱ कारखान्यांवर गुन्हा दाखल करण्याचा सल्ला द्यायचा; या अजित पवारांच्या भूमिकेमुळे सहकार विश्वात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. अजितदादांच्या या सल्ल्याची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोलपूर तसेच पंढरपूर तालुक्यात प्रचंड व्हायरल होत आहे.