प्रशासनाने प्रत्यक्ष नुकसानीची नोंद न घेता कागदी घोडे नाचवल्याचा आरोप

प्रशासनाची पैसेवारी संशोधनाचा विषय, शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्याचा मार्ग कठीण

0

हिंगोली  : हिंगोली जिल्ह्यात  सततच्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. तरीही प्रशासनाने बुधवारी हंगामी पैसेवारी ६४.५९ पैसे एवढी जाहीर केली. प्रशासनाने काढलेली पैसेवारी संशोधनाचा विषय बनला असून त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्याचा मार्ग कठीण होणार आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष नुकसानीची नोंद न घेता कागदी घोडे नाचवल्याचा आरोप होत असून या संदर्भात आता लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची आवश्यकता आहे.

हिंगोली जिल्ह्यात यावर्षी हंगामाच्या सुरवातीलाच पाऊस झाल्यानंतर चांगले उत्पादन हाती येईल, अशी अपेक्षा होती. मात्र अनेक ठिकाणी सोयाबीनची पेरणी दुबार तर काही ठिकाणी तिबार करावी लागली. त्यामुळे चांगले उत्पादन येण्याच्या आशा मावळल्या. खरीप हंगामातील उडीद, मुगाच्या वेळी झालेेल्या जोरदार पावसामुळे ही पिके हाती आलीच नाहीत. या पिकांचे उत्पादन हेक्टरी ५० ते ६० किलो झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरीप हंगामात ४.०२ लाख हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र असताना प्रत्यक्षात ३.८४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त २.६० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. तर ८२८८ हेक्टरवर मूग, ६६२० हेक्टरवर उडीद तर ४४६३९ हेक्टरवर तुरीची तर ३८७९८ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. जिल्ह्यात पिकांची पेरणी झाल्यानंतर सततच्या पावसामुळे पिकांना पाण्याचा ताण पडला नाही. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या सोयाबीन काढणीला आले असून मागील २० दिवसांपासून सतत कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना कोंबे फुटली आहेत. तर कापसाची बोंडे सडली आहेत. या परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला असताना शासनाच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांची पैसेवारी ६४ ते ७० टक्के दाखवून शेतकऱ्यांना सुगीचे दिवस असल्याचे चित्र निर्माण केले. कृषी मंत्रीही नुकसान पाहून हळहळले : जिल्ह्यात कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिक नुकसानीची पाहणी केली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. यावेळी त्यांना जिल्ह्यातील नुकसानीची तीव्रता दिसून आली. भुसे यांनी नुकसान पाहून हळहळही व्यक्त केली हाेती. मात्र त्यानंतरही प्रशासनाने ६४.५९ पैसे हंगामी पैसेवारी जाहीर केली आहे. पीक नुकसानीनंतरही हंगामी पैसेवारी ५० पैसे पेक्षा अधिक कशी आली, हा संशोधनाचा विषय बनला आहे. यामुळे आता लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनीच प्रशासनाच्या या कार्यपद्धतीविरुद्ध आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात हिंगोली तालुक्यात १५२ गावांची हंगामी पैसेवारी ७०.०१ पैसे, सेनगाव तालुक्यातील १३३ गावातील हंगामी पैसेवारी ६५.९७ पैसे, कळमनुरी तालुक्यातील १४८ गावातील हंगामी पैसेवारी ५८.९८ पैसे, वसमत तालुक्यातील १५२ गावातील हंगामी पैसेवारी ६५ पैसे तर औंढा नागनाथ तालुक्यातील १२२ गावातील हंगामी पैसेवारी ६३ पैेसे जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ७०७ गावांतील हंगामी पैसेवारी ६४.५९ पैसे जाहीर झाली आहे.

यावर्षी आतापर्यंत १२० टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात एकूण ९९७ मिलिमीटर (११८ टक्के) पाऊस झाला आहे. कळमनुरी तालुक्यात एकूण ८८६.४ मिलिमीटर (११४ टक्के), वसमत तालुक्यात ८६३.४ (१०७ टक्के), औंढा नागनाथ तालुक्यात ११९२ (१६६ टक्के), सेनगाव तालुक्यात एकूण ८०२.९ मिलिमीटर (११२ टक्के) पाऊस झाला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.