वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच दारुच्या पार्ट्या
'प्रहार'कडून जिल्हाधिकाऱ्यांच्या दरवाजात बाटल्यांचा खच
वर्धा : वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या आहेत . यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी या सर्व रिकाम्या दारुच्या बाटल्या थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाच्या दारासमोरच उभ्या केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ओल्या पार्ट्यांचे पितळ उघड पडल्याचीही चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात नेमके कोण दारू रिचवते? असाच प्रश्न प्रहार संघटनेने उपस्थित केला. चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर दारू बाटल्यांचा खच आणून ठेवल्याने प्रशासनाचीही चांगलीच तारांबळ उडाली. वर्धा दारुबंदीचा निर्णय घेतलेला जिल्हा असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून जंग्गी पार्ट्या होत असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता ‘प्रहार’ संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील रिकाम्या दारुच्या बाटल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आणून ठेवल्याने या प्रश्नाला चांगलीच वाचा फुटली आहे. ‘प्रहार’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी या बाटल्यांचा खच पडल्याचं लक्षात येताच, या सर्व रिकाम्या बाटल्या गोळा करुन जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवल्या. दारुबंदी जिल्ह्यात दारु आणि ती देखील जिल्हाधिकारी कार्यालयात कशी? असाच सवाल ‘प्रहार’ने उपस्थित केला. जिल्हाधिकारी यांच्या कक्षाबाहेर ठिय्या आंदोलन करुन निषेध नोंदवण्यात आला. यावेळी संबंधितांवर कारवाईची मागणीही करण्यात आली. दारुबंदी असलेल्या वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दारुच्या बाटल्या कोठून आल्या? अधिकारी-कर्मचारीच दारुमधून गालबोट लावत असल्याचा आरोप ‘प्रहार’ संघटनेने केला आहे. तसेच संबंधित दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली आहे.