अक्कलकोटचे ‘स्वामी समर्थ मंदिर’ सोमवारी पहाटे पाच वाजेपासून उघडणार!

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या' जयघोषात मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले

0

सोलापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली मंदिरे उघडण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर उद्यापासून (सोमवार, 16 नोव्हेंबर) मंदिरे उघडण्यात येणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर उद्या भाविकांसाठी खुले होणार आहे.

अक्कलकोट येथे ‘अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय’ असा जयघोष करत उद्या पहाटे पाच वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. अक्कलकोट शहरात स्वामी दर्शनासाठी दररोज पाच हजारांहून अधिक भाविक येतात. मात्र कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने मंदिरे बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अक्कलकोटचं स्वामी समर्थांचे मंदिरही भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता राज्य सरकारच्या आदेशानुसारच स्वामी समर्थ मंदिर पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांसाठी खुले करणार आहे. त्याकरिता मंदिर प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. सोमवारी पहाटे पाच वाजता नित्य पूजेनंतर भाविकांना दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती स्वामी समर्थ मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाने मंदिरावर अवलंबून असणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे मोठे हाल होते. मंदिर बंद असल्यामुळे दुकाने बंद होती. मात्र आता उद्यापासून मंदिरे उघडणार असल्यामुळे त्यांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटणार आहे.

राज्य सरकारने दिवाळी पाडवा अर्थात सोमवारपासून मंदिर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. असे असले तरी मंदिर संस्थांनांना सरकारकडून नियमावली घालून देण्यात आली आहे. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, 10 वर्षांच्या आतील लहान मुले आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मास्क घातल्याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश मिळणार नाही. शिर्डीतील साईमंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्या भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करून ठेवलेले आहे; त्यांनीच शिर्डीत यावे, असे आवाहनदेखील साईबाबा संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

तुळजाभवानी मंदिरात रोज 4 हजार भाविकांना दर्शन

ळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकिंग करावी लागणार असुन दररोज चार हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे. त्यात 1 हजार पेड दर्शन पास तर 3 हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. ऑनलाइन पास सोबतच ऑफलाईन पास सुद्धा भाविकांना मंदिर परिसरात काढता येणार आहेत.

विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग

विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करावी लागणार आहे. पंढरपूरात दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 65 वर्षांवरील आणि 10 वर्षांपर्यंतच्या मुलांना दर्शनास बंदी घातली आहे. नित्योपचाराचा वेळ वगळता उरलेल्या वेळात दर एक तासाला शंभर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येईल, असा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.