कृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन, सातवा वेतन आयोगाची मागणी

उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतली आंदोलकांची भेट

0

अहमदनगर : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील कृषी विद्यापीठामधील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. अधिकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन 3 नोव्हेंबरपासून सुरू आहे.

आंदोलक आता आक्रमक झाले असून रविवारपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीसह सगळ्या कृषी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. राहुरी येथे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलकांची भेट घेतली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज राज्य सरकारचा निषेध केला. सरकारने मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.  2018 पासून वारंवार मागणी करूनही सातवा वेतन आयोग न मिळाल्याने राज्यातील सर्वच कृषी विद्यापीठात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन विविध स्तरांवर करण्यात येत आहे. सुरुवातीला निषेध मोर्चा व नंतर सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. मात्र, सरकारने कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने आता काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलन स्थळी जात आंदोलकांची भेट घेतली. मात्र, आंदोलक आणि सरकारमध्ये झालेल्या चर्चेत कुठलाही तोडगा निघाला नाही. मात्र, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले आहे.

आंदोलनाचा शेतकऱ्यांना फटका

दरम्यान, कृषी विद्यापीठातील काम बंद आंदोलनामुळे शेतक-यांची‌ फरफट होत आहे. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बीबियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.  गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून भविष्यात असेच आंदोलन सुरू राहिले तर शेतकरी ही अडचणीत येण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे बी-बियाणांची वाढती मागणी आहे. त्यामुळे सरकार नेमके काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकीकडे कोरोनाचे संकट, दुसरीकडे बळीराजा संकटात, अशा परिस्थितीत आता बळीराजाला मदत करणाऱ्या कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा आंदोलन करण्यात येत असून सरकार दिवाळीपूर्वी घोषणा करून दिलासा देणार का, हे पाहावे लागणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.