कोरोनानंतर महाराष्ट्रावर नव्या विषाणूजन्य रोगाचे सावट
पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचा इशारा
वसई : कोरोना रोगाचे सावट देशात सध्या असतानाच आता ‘क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर ‘ या नव्या विषाणूजन्य रोगाचे आगमन महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या पशुपालकांमध्ये, मांस विक्रेत्यांमध्ये आणि पशुसंवर्धन अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना रोगाचे सावट असतानाच आता ‘क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर ‘ या नव्या विषाणूजन्य रोगाचे आगमन महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. हा रोग गुजरातमधून महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या जिल्ह्यात पसरण्याची शक्यता असल्याने पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयामार्फत या रोग संबंधी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्रा मध्ये गोचिडांमुळे क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर या साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता असल्याने राज्याच्या सीमा भागातील पशुपालक आणि मांस विक्रेत्यांनी सतर्क राहण्याचे अहवान पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी केले आहे. या रोगामुळे बाधित जनावरांचे संक्रमण मनुष्यामध्ये होत असल्याने गुजरात महाराष्ट्र सीमा भागातील पशुपालकांना या रोगाबाबत जास्त सतर्क व जागरूक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या रोगाचा प्रसार गुजरातमधील काही जिल्ह्यात आढळून आला असून काँगो, इराण, द आफ्रिका,चीन, हंगेरी या देशात सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. पालघर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सर्व आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. सदर विषाणूजन्य रोग एका विशिष्ट प्रकारच्या गोचिडाद्वारे एका जनावरांमधून दुसऱ्या जनावरांना होतो. ऑस्ट्रीच, शहामृग या पक्षाद्वारे देखील या रोगाचा प्रसार होण्यास मदत होते. बाधित जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने व बाधित जनावरांचे मांस खाल्याने या रोगाचा प्रादुर्भाव मानवामध्ये दिसून येतो. या रोगाची लागण झाल्यास वेळीच निदान व उपचार न झाल्यास 30 टक्के मनुष्याचा मृत्यू होतो. या रोगावर हमखास व उपयुक्त असे उपचार नसल्याने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर डॉ प्रशांत कांबळे यांनी दिली.
रोगाची लक्षणे : • या रोगाने बाधित झालेल्या माणसांमध्ये, सुरुवातीला डोके दुखणे, जास्त ताप येणे, सांधे दुखी, पोटदुखी उलटी होणे. • डोळे लाल होणे, घश्यात तसेच तोंडाच्या वरच्या भागात फोडी येणे. • आजार बळावल्यास त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, नाकातून रक्त येणे. • मृत्यूचे प्रमाण 9 ते ३० टक्के असते.
प्रतिबंधक उपाय योजना : • पालघर जिल्हा हा गुजरात राज्याच्या सीमेलगत असल्याने या रोगाचा प्रसार सदर जिल्हयात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वेळीच च सर्व खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे व या रोगाबाबत तसेच गोचीड निर्मूलनाबाबत योग्य ती काळजी घेऊन सदर आजाराबाबत पशुपालकांनी जागरूक व सतर्क राहणे आवश्यक असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी सांगितले. • शेतकरी, पशुपालक, पशुवैद्यक यांनी गोठ्याची स्वच्छता राखणे, मुख पट्टी, हॅन्ड ग्लोव्हस, गमबूटचा वापर करणे. • सदर रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी जण माणसात या बाबत माहिती प्रसिद्ध करणे, गोचीड निर्मूलन कार्यक्रम राबविणे, जनावरांच्या अंगावरील व गोठ्यातील कीटकांचे व गोचिडांचे संपूर्णतः उच्चाटन करणे, बाह्य कीटकांचा व गोचिडांचा नाश करणारी कीटकनाशके यांची फवारणी करणे आवश्यक. • गुजरात राज्यातून पालघर जिल्ह्यात रोज विविध जनावरांची वाहतूक होत असल्याने दोन राज्याच्या सीमेवर असणाऱ्या पशुधन तपासणी नाक्यावर सर्व जनावरांची तपासणी करून आवश्यक त्या उपाय योजना राबविणे. बाधित जनावरे वेगळी काढून त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपचार करणे . • गोचिडे हाताने काढणे, मारणे कटाक्षाने टाळावेय • सदर रोग पशूंचे कच्चे मांस खाल्याने देखील होऊ शकतो त्यामुळे मांस चांगल्या प्रकारे शिजवून खावे .या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व रोगाचा प्रसार रोखण्यासाठी गोचीड निर्मूलनाचा कार्यक्रम प्राधान्याने घेण्याबाबत सर्व ती आवश्यक खबरदारी घेण्याचे व पशुपालकांनी या आजाराबाबत जास्तीत जास्त जागरूक राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी सांगितले.