लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने, एमबीए तरुण बनला मंगळसूत्र चोर
इचलकरंजीतील विविध भागांत धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास
कोल्हापूर : इचलकरंजीत धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणार्या उच्च शिक्षित चेन स्नॅचरला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. एमबीएचे शिक्षण घेतलेला हा तरुण लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्याने चेन स्नॅचिंग करू लागला. आकाश संजय हिंगे (वय 22) असे या चेन स्नॅचर तरुणाचे नाव आहे. त्याने तीन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 56 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अॅक्टिव्हा मोपेड, मोबाईल, असा एकूण 3 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लॉकडाऊन काळात महिलांच्या गळ्यातील दागिने धूम स्टाईलने लांबविण्याचे प्रकारात वाढ झाल्याची माहिती होती. या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली. त्यामधून पोलिसांना या चेन स्नॅचरच्या वाहनाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत संशयावरुन आकाश हिंगेला ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच हिंगेने चोरी केल्याची कबुली दिली. त्याने तीन ठिकाणी चोरी केल्याचे त्याने सांगितले. यापैकी सुंदर बागेच्या मागे 13 जूनला स्नेहा गरगटे, 2 ऑगस्टला अयोध्यानगर परिसरातील सुमन चौधरी आणि आठ दिवसांपूर्वी राधाकृष्ण चित्रमंदिर परिसरात भारती कासट या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि चेन लांबविल्याची कबुली हिंगे याने दिली. लॉकडाऊनमुळे पैशाची अडचण आहे, घरातील नातेवाईकांना कोरोना झाला आहे, असे सांगून त्याने विटा येथील सराफाला चोरीचे दागिने विकल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून सोन्याचे दोन मंगळसूत्र, चेन, असे 56 ग्रॅम वजनाचे दागिने, अॅक्टिव्हा मोपेड आणि मोबाईल असा 3 लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्याला गावभाग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे हिंगे हा उच्चशिक्षित असून त्याने मॅक्रोट्रॅनिक्स एमबीएचं शिक्षण घेतले आहे. त्याचे आणखीन कोणी साथीदार आहेत का, याचा पोलिस शोध घेत आहे. लॉकडाऊनमुळे काम गेल्याने चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहपोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.