काँग्रेसप्रवेशानंतर उदयसिंह पाटलांचा निर्धार, “आता एकच अजेंडा…”

राजकीय विरोधक पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव पाटील उंडाळकर पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर

0

कराड : “संघर्ष व्यक्तिगत नव्हता, तर विचारांचा होता. ज्या विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या काँग्रेसची विचारधारा टिकवण्यासाठी एकत्र आलो आहोत” अशी प्रतिक्रिया साताऱ्यातील उंडाळकर गटाचे युवा नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी दिली. माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी कराड तालुक्यात काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. काँग्रेसमधील दिग्गज नेते – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  आणि विलासकाका पाटील उंडाळकर हे कट्टर विरोधक यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर आले.

पृथ्वीबाबा आणि विलासकाका या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या तीस वर्षांपासून संघर्ष सुरु होता. दोघांच्याही राजकीय वैरामुळे अनेकदा काँग्रेसला फटकाही बसला होता. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात अपक्ष लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव पाटील उंडाळकर हे राजकीय विरोधक पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. विलासकाका पाटील उंडाळकर यांचा बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये जाहीरपणे सक्रिय होत आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याचा निर्धार केला.“ज्या विचारांनी देशाला स्वातंत्र मिळवून दिले काही सामाजिक तत्त्व, समाजाला त्या विचारांपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा संघर्ष असाच पुढे सुरू राहिला असता, तर त्यांना थोपवणे अडचणीचे झाले असते आणि समाजाची हानी भरुन आली नसती. म्हणून संघर्ष मिटवून, मतमतांतरे संपवून, विचारांना प्रस्थापित करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमचा एकच अजेंडा आहे, काँग्रेसची विचारसरणी समाजात रुजवणे आणि समाजाचा विकासात्मक उत्कर्ष करणे” अशी प्रतिक्रिया उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.