प्रवेश सुरू, परंतु विद्यार्थी फिरकेना; महाविद्यालयांना जागा भरण्याची चिंता
शहरात गेल्या दोन-तीन वर्षांपासून अकरावीची प्रवेशाची ऑनलाईन पद्धतीने
औरंगाबाद : शहरात गेल्या दोन-तीन वर्षांपासून अकरावीची प्रवेशाची ऑनलाईन पद्धतीने होत आहे.एसईबीसीच्या आरक्षणामुळे दिलेल्या स्थगितीनंतर अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली खरी परंतु, दुसरी फेरी शनिवार दि 5 पासून सुरू झाली. मात्र प्रवेशासाठी विद्यार्थीच येईना, तर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी फोन केले असता, आम्ही गावाकडे प्रवेश घेतला, अशी उत्तरे विद्यार्थ्यांकडून येत असल्याचे खुद्द शहरातील महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले.
दोन-तीन वर्षांपासून अकरावीची प्रवेशाची ऑनलाईन पद्धतीने होत आहे. यंदाही प्रक्रिया कोरोनामुळे उशिराने सुरू झाली. त्यानंतर दीड महिना एसईबीसीच्या आरक्षणामुळे न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर 1 डिसेंबरपासून ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. 5 डिसेंबर रोजी प्रवेशाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत अलॉटमेंट मिळाली ते विद्यार्थी प्रवेशासाठी येत नसल्याने त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून फोनवरून संपर्क करून ‘तुम्हाला प्रवेशासाठी अलॉटमेंट मिळाली’ असल्याचे सांगितले असता, विद्यार्थ्यांकडून सर आता तर आम्ही वाट पाहून गावाकडे प्रवेश घेतला, अशी उत्तरे अनेक विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना किचकट वाटत असल्याने विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले आहे, असे शहरातील महाविद्यालय व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. शिवाय एसईबीसी आरक्षणाच्या स्थगितीच्या अगोदर प्रवेशाची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यात ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली, अशांचे कागदपत्रे महाविद्यालयाने जमा करून ठेवले होते. मात्र स्थगिती उठविल्यानंतर पुन्हा नव्याने प्रवेशाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यात अगोदरच्या यादीतील विद्यार्थ्यांची नावेच नसल्याची माहितीही शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. यावर देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर.बी.गरुड यांना विचारले असता, उशिरापर्यंत चाललेली प्रक्रिया आणि ऑनलाइनच्या अडचणी आणि काही विद्यार्थ्यांनी खासगी क्लासेसला संलग्न असलेले महाविद्यालय प्रवेशासाठी निवडल्याचा देखील परिणाम यंदाच्या प्रवेश प्रक्रियेवर दिसून येत आहे. अकरावी प्रवेशासाठी एकूण ११६ महाविद्यालये असून त्यांची प्रवेश क्षमता ३१ हजार ४६५ आहे. पहिल्या फेरीसाठी ८ हजार ७४० विद्यार्थ्यांपैकी ६१०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. तर कोटा प्रवेशात १७८२ जणांनी प्रवेश घेतले. दुसऱ्या फेरीत 5 हजार 44 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे. यात अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांना 9 डिसेंबरपर्यंत दरम्यान प्रवेश घेण्यास मुदत दिली आहे.