सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर
ठाकरे पिता-पुत्राने राजीनामा द्यावा, निलेश राणेंची मागणी
सिंधुदुर्ग : “अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाच पाहिजे” अशी मागणी माजी खासदार नीलेश राणे यांनी केली आहे. “आदित्य ठाकरे यांचे नाव सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर येणे, ही साधी गोष्ट नाही. बिहार सरकारच्या कौन्सिलने नाव घेतले आणि सर्वोच्च न्यायालयाने ते नाव काढून टाकले नाही. आरोपी म्हणून यांचे नावही त्या रेकॉर्डवर गेले आहे” असे नीलेश राणे म्हणाले.
“26-11 नंतर रामगोपाल वर्मासोबत ताज हॉटेलमध्ये पाहणी करायला गेलेल्या विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आज तर मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव मर्डर मिस्ट्रीमध्ये रेकॉर्डवर आले आहे. हे पण तेवढेच गंभीर आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री व आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिलाच पाहिजे. तपासणी कामात मुलाला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री गडबड करू शकतात, म्हणून राजीनाम्याची मागणी केली आहे” असे नीलेश राणे म्हणाले. “संजय राऊत यांना जास्त महत्त्व देऊ नका, ते शिवसेनेच्या पगारावर असल्यामुळे ठाकरे कुटुंबाला खुश करणे हे त्यांचे काम आहे,”अशी एकेरी भाषेतील टीका नीलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केली. “राजस्थानमध्ये काय घडले हे सचिन पायलट यांना जाऊन विचारा, गेहलोत साहेबांना विचारा. सचिन पायलटना गेहलोत साहेबच निक्कमा, नाकारा म्हटले होते. त्यांचा आपसातला वाद होता, त्यात सचिन पायलट यांनी माती खाल्ली, आमदार टिकत नसल्यामुळे परत गेले. भाजप कशाला मध्ये पडेल, तुमच्या संसारातला तो वाद आहे, बसून सोडवा,” असेही नीलेश राणे म्हणाले “ऑपरेशन लोटस फेल कसे जाईल, ऑपरेशन लोटस केलेच नव्हते. संजय राऊत यांना कसेही करून विषय डायव्हर्ट करायचे आहेत, मूळ विषयापासून सगळे दुसरीकडे वळवायचे असते, म्हणून त्यांचे हे प्रयत्न असतात, नेहमीच असतात” असा घणाघातही नीलेश राणे यांनी केला.