अभिनेत्री शशिकला यांचे निधन, वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी घेतला जगाचा निरोप
आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जुन्या जमान्यातील अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन
मुंबई :आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जुन्या जमान्यातील अभिनेत्री शशिकला यांचे निधन झाले. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनावर बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे.
कुलाबा येथील निवासस्थानी काल दुपारी 12 वाजता त्यांनी अखेरचा निरोप घेतला. सत्तरच्या दशकात त्यांनी नायिका आणि खलनायिका रंगविल्या होत्या. त्यांच्या खलनायिकांच्या भूमिका त्या काळात प्रचंड गाजल्या होत्या. त्यांनी 100 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. शशिकला यांचे संपूर्ण नाव शशिकला जावळकर असे होते. सोलापूरमध्ये 4 ऑगस्ट 1932 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचं बालपण ऐशोआरामात गेले. मात्र सिनेसृष्टीत संघर्ष करताना त्यांना अनेक चढ-उतार पाहावे लागले. त्यांचे वडील फार मोठे उद्योजक होते. शशिकला यांना सहा बहीण आणि भाऊ होते.
नुरजहाँ भेटल्या अन्…
शशिकला यांनी वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच नृत्य करण्यास सुरुवात केली. याच वेळी त्यांनी गाणे शिकण्यासही सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हळूहळू अभिनय क्षेत्राकडे मोर्चा वळवला. त्यांच्या वडिलांचे उद्योगात दिवाळे निघाले. त्यामुळे त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. मुंबईत आल्यावर शशिकला यांची नुरजहाँ यांच्याशी भेट झाली. त्यामुळे त्यांना झीनत या सिनेमात काम मिळाले. त्यानंतर त्यांना आणखी तीनचार चित्रपटात काम केले. त्यावेळी त्यांना 400 रुपये महिना मिळायचा. 1953 मध्ये व्ही. शांताराम यांनी त्यांना तीन बत्ती चार रास्ता या सिनेमात काम केले. त्यानंतर वयाच्या 20व्या वर्षीच त्यांनी संसार थाटला. प्रसिद्ध गायक के. एल. सहगल यांचे नातलग ओमप्रकाश सहगल यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पुढे त्यांना दोन मुलीही झाल्या.
खलनायिका म्हणून बसविला जम
शशिकला यांनी 1959 मध्ये सुजाता या सिनेमात खलनायिका साकारली आणि त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. त्यानंतर त्यांना खलनायिकेच्याच भूमिका ऑफर होऊ लागल्या. त्यातही त्यांनी वेगळ्या भूमिका असणारे सिनेमे स्वीकारण्यास सुरुवात केली. आरती या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेसचा फिल्मफेअर अॅवार्डही मिळाला. तर गुमराह सिनेमातील उत्कृष्ट खलनायिकेचा फिल्म फेअर अॅवार्ड मिळाला.
पद्मश्री आणि रुग्णसेवा
सिनेमातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते. तसेच त्यांना व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवार्ड देऊनही गौरवण्यात आले आहे. शेवटच्या काळात त्यांनी इगतपुरी येथील मदर तेरेसा यांच्या रुग्णालयात रुग्णसेवा करण्याचं काम केले.
गाजलेले सिनेमे
‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ (2003) नीला आकाश, छोटी सी मुलाकात, शतरंज, आहिस्ता-आहिस्ता, मुझसे शादी करोगी, आदी सिनेमात त्यांनी काम केले आहे. त्या 2005 पर्यंत अभिनय करत होत्या.