नादच खुळा, ग्रामपंचायत निवडणुकींचा चढला ज्वर, प्रचाराला अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा रोड शो
गावांमधील पॅनल आणि मंडळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी लढवतात नवनवीन शक्कल
सातारा : सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा ज्वर चढला आहे. लोकसभा निवडणुकीतील वातावरण सामान्य वाटावे इतके निवडणूक असलेल्या गावातील प्रचाराचे वातावरण तापले. त्यातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी गावांमधील पॅनल आणि मंडळे नवनवीन शक्कल लढवत असल्याचे दिसून येत आहे.
साताऱ्यात देखील असेच पाहायला मिळाले. सातारा शहरालगत असणाऱ्या वाढे गावात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पॅनेल वेगवेगळी शक्कल लढवताना दिसला. वाढे गावातील वाढेश्वर अजिंक्य पॅनेलने तर यावेळी निवडणूक प्रचारासाठी थेट अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनाच आवताण दिले. प्रिया बेर्डे यांचा जिप्सी गाडीतून गावात रोड शो घेऊन प्रचाराची सांगता केली. यावेळी प्रिया बेर्डे यांना पाहण्यासाठी वाढे गावासह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. यामुळे गावात होणाऱ्या दुरंगी लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले. वाढे गावात ग्रामपंचायत निवडणुकीत वाढेश्वर अजिंक्य पॅनेल आणि अजिंक्य पॅनेल वाढे, अशी दुरंगी लढत पहायला मिळत आहे. गावात 11 सदस्य संख्येची ग्रामपंचायत आहे. सध्या अनुसुचित जमातींची व्यक्ती गावात नसल्यामुळे 10 जागांवर ही निवडणूक लढवली जात आहे. दोन्ही पॅनेलकडून समोरासमोर एकूण 20 उमेदवार रिंगणात आहेत. या गावात पाणी योजना, गावातील बंदिस्त गटारे, गावची विकासाची प्रलंबित कामे, अशा मुद्द्यांवर ही निवडणूक होत आहे. दोन्ही पॅनेल ताकदीने निवडणूक लढत आहेत. यामुळे गावात होणाऱ्या या दुरंगी लढतीचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.