नगरमध्ये भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, चार वर्षांनी आरोपींना ठोठावली शिक्षा

अखेर चार वर्षानंतर मृत हिंमत जाधव यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त

0

अहमदनगर : अहमदनगर शहरात झालेल्या हिंमत जाधव खून प्रकरणात आज न्यायालयाने सर्व सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच एक लाख वीस हजार रुपये दंड ठोठावला आहे. त्यामुळे अखेर चार वर्षानंतर मृत हिंमत जाधव यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
हिंमत जाधव हा त्याचा मित्र संतोष चव्हाण यांच्यासोबत 13 सप्टेंबर 2016 रोजी अहमदनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात त्याच्या कामकाजासाठी दुचाकीवरून आलेला होता. न्यायालयातील कामकाज संपवून तो संतोष चव्हाण याच्या गाडीवर मागे बसून औरंगाबाद रस्त्याने घरी जात होता. मात्र तेव्हाच त्यांची गाडी इमामपूर घाटाजवळ असताना मागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी हिंमत जाधव यांच्यावर बंदुकीतून गोळया झाडल्या. त्यामुळे हिंमत जाधव खाली पडला व मोटारसायकल घसरली. झालेल्या प्रकारामुळे घाबरून संतोष चव्हाण याने घाटाखाली चहा पिण्यासाठी त्यांची वाट बघत असलेल्या लक्ष्मण कुसळकर यांच्याकडे धाव घेतली. दरम्यानच्या काळात हिंमतवर झालेल्या गोळीबाराची माहिती त्याच्या घरच्यांना तसेच पोलिसांना मिळाल्यामुळे घटनास्थळी हिंमतचे वडील, भाऊ व पोलिस पोहोचले. घटनास्थळी हिंमत हा रक्ताच्या थारोळयात पडलेला होता. त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर हिंमतचे प्रेत शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. झाल्या प्रकाराबाबत संतोष चव्हाण याने एम.आय.डी.सी.पोलिस स्टेशन येथे तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार एम.आय.डी.सी.पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुरुवातीला गुन्ह्याचा तपास एम.आय. डी.सी.पोलिस स्टेशनचे सहा.पो.निरी.राहुल पवार यांनी केला. त्यानंतर मयत हा भिल्ल समाजाचा असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रकरणाचा पुढील तपास सहा.पोलिस अधिक्षक आनंदा भोईटे यांनी केला व बहुतांश साक्षीदारांचे जबाब, काही आरोपींना अटक, पंचनामे, हत्यार जप्ती इ.महत्वपूर्ण बाबी पूर्ण केल्या. त्यानंतर आनंदा भोईटे यांची बदली झाल्याने प्रकरणाचा पुढील तपास सहा.पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी केला. उर्वरित आरोपींना अटक करून पंचनामे, हत्यार जप्ती केले. सदर प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर सहा.पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी मा.न्यायालयात आरोपीविरूद्ध दोषारोपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी मा.जिल्हा न्यायाधीश एस.आर.जगताप यांच्यासमोर झाली. त्यांच्याकडे सरकार पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील केदार गोविंद केसकर यांनी एकुण 25 साक्षीदार तपासले. माहे फेब्रुवारी 2020 मध्ये मा.जिल्हा न्यायाधीश एस.आर.जगताप यांनी रत्नागिरी येथे बदली झाल्याने प्रकरणातील पुढील कामकाज, सरकार पक्षाचा युक्तिवाद व आरोपींच्या वतीने युक्तिवाद श्रीमती.एम.व्ही. देशपांडे यांचेसमोर करण्यात आले.

का करण्यात आली हिंमत जाधव यांची हत्या?

न्यायालयासमोर आलेल्या एकूण पुराव्यानुसार आरोपी राजु शेटे याने मयताबरोबर असलेल्या शत्रुत्वापोटी आरोपी कृष्णा कोरडे, सोमनाथ मोरे, अजिनाथ ठोंबरे यांना हिंमतला मारण्याची सुपारी दिली व घटनेच्या दिवशी आरोपी संदीप थोपटे, राहुल दारकुंडे यांनी मयताचे लोकेशन गोळया झाडणाऱ्या आरोपींना वेळोवेळी दिले. तसेच आरोपी जावेद शेख याने गुन्ह्यात वापरलेल्या बंदुका इतर आरोपींना पुरविल्या, ही बाब सिध्द झाली. सदर खटल्यामध्ये प्रत्यक्षदर्शी संतोष चव्हाण, मयताचे वडील अभिमन्यू, बहीण दीपाली तसेच फोटोग्राफर दादा शिर्के, सीसीटीव्ही. तज्ञ ब्रजेश गुजराथी, शवविच्छेदन करणारे औरंगाबाद येथील डॉ.विकास राठोड, कलिना मुंबई येथील बॅलेस्टिक एक्सपर्ट डॉ. मुलानी, सीसीटीव्ही. व फोटो तज्ञ वर्षा भावे, तपासी अधिकारी राहुल पवार, आनंदा भोईटे व मनीष कलवानिया व पंच यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. मा.न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा, कागदोपत्री पुरावा तसेच सहाय्यक सरकारी वकील केदार गोविंद केसकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा.न्यायालयाने आरोपींना दोषी धरले व त्यांना भा.द. वि.का.कलम 302, 120ब अन्वये दोषी धरून प्रत्येक आरोपीस आजन्म कारावासाची व एकूण 1,19,000/-रूपये दंडाची शिक्षा दिली.

सदर खटल्याचेी सुनावणीदरम्यान पैरवी अधिकारी पो.हे.कॉ.बी.बी.बांदल, पो.कॉ.दीपक गांगर्डे यांनी सहाय्यक सरकारी वकील केदार गोविंद केसकर यांना साहाय्य केले. तसेच सदर प्रकरणाचे कामकाज यशस्वीरित्या चालविण्याकामी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी सहाय्यक सरकारी वकील केदार गोविंद केसकर यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.
आज आरोपींना शिक्षा करतेवेळी न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा अतिशय कडक बंदोबस्त कॅम्प पोलिस स्टेशनचे पो.उप.निरीक्षक देशमुख यांच्या अधिपत्याखाली नेमण्यात आलेला होता. त्यांना न्यायालयातील पोलिस सुरक्षा अधिकारी स.फौ. एल.एम.काशिद, हे.कॉ. सांगळे व हे.कॉ.पटेल यांनी साहाय्य केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.