मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल पोलिस अर्णव गोस्वामींच्या चौकशीसाठी आज (4 नोव्हेंबर) घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल पोलिस अर्णव गोस्वामींच्या चौकशीसाठी आज (4 नोव्हेंबर) घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र अर्णव गोस्वामीला नेमकी कोणत्या प्रकरणात अटक केली आहे? हे प्रकरण नेमके काय आहे? अन्वय नाईक यांनी आत्महत्या का केली? या सर्व तपास पोलिसांकडून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच ठिकाणी त्यांची आई कुमुद नाईक (84) यांचाही मृतदेह आढळून आला होता. तसेच त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. अन्वय नाईक हे इंटिरिअर डिझाईनर होते. ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय यांच्या ‘कॉनकॉर्ड’ कंपनीने ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझाईनिंगचे काम केले होते. हे काम पूर्ण झाल्यानतंरही नाईक यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नव्हते. कामाचे पैसे मिळवण्यासाठी अन्वय यांनी सातत्याने अर्णव गोस्वामींसह इतरांना विनंती केली होती. मात्र अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. दुसरीकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिकांकडून या कामासाठी माल घेतला होता, त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता. पण कामाचे पैसे न मिळाल्याने अन्वय यांना नैराश्य आले होते. याच नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. अन्वय नाईक यांच्या कंपनीने अर्णब गोस्वामी यांच्या ‘रिपब्लिक टीव्ही’चा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्याने अन्वय नाईक यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे. अन्वय यांनी त्यांच्या आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे लिहिली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. रायगड पोलिसांसाठी अन्वय यांच्या ‘कॉनकॉर्ड डिझायनर कंपनी’च्या विविध कार्यालयांची तपासणी केली होती. तसेच ही हायप्रोफाईल केस असल्याने तपासासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष तपास पथक तयार केले. सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या आर्थिक व्यवहारांची खातरजमा करण्यासाठी या तपास पथकाने अन्वय यांच्या मुंबईतील कार्यालयाची तपासणी केली.