प्रियांका गांधींसोबत गैरवर्तन, नोएडा पोलिसांकडून खेद व्यक्त, चौकशीचे आदेश
महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या प्रकरणी ट्विटद्वारे केला होता प्रश्न उपस्थित
नोएडा : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींच्या सोबत झालेल्या गैरवर्तनप्रकरणी नोएडा पोलिसांनी खेद व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले. महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या प्रकरणी ट्विटद्वारे प्रश्न उपस्थित केले होता. राऊत यांच्या ट्विटला उत्तर देताना नोएडा पोलिसांनी प्रियांका गांधींसोबत घडलेल्या गैरवर्तनप्रकरणी भूमिका स्पष्ट केली.
नितीन राऊत यांनी प्रियांका गांधींचा फोटो ट्विटरवर शेअर करत उत्तर प्रदेश पोलिसांविषयी प्रश्न उपस्थित केले होते. “कायद्याचे जाणकार आणि पोलिस अधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घ्यावी. पोलिसांच्या कार्यपद्धती मार्गदर्शिकेनुसार, कोणत्याही पुरुष पोलिस कर्मचाऱ्याला कोणत्याही महिलेला सार्वजनिकरित्या चुकीच्या पद्धतीने स्पर्श करता येत नाही. प्रियांका गांधी सोबत घडलेली घटना कायदेशीर आणि सामाजिकदृष्ट्या योग्य आहे का? उत्तर प्रदेश पोलिसांनी त्या पोलिसाला शिक्षा होईल का, याचे उत्तर द्यावे, असे ट्विट नितीन राऊत यांनी केले होते.