धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत ‘त्या’ जोडप्यांचा आगळावेगळा विवाहसोहळा

कोणत्याही धार्मिक पूजा-अर्चा न करता नवरा-नवरींनी एकमेकांना हार घालत वंदे मातरम या गीताचे गायन आणि विवाह संपन्न

0

बीड : एचआयव्हीबाधित परिवारातील अनाथ मुला-मुलींच्या दोन जोडप्यांच्या अनोखा विवाह सोहळा बीडमध्ये संपन्न झाला. विशेष म्हणजे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड तालुक्यातील पाली येथील आनंदग्राम येथे संपन्न झाल्यानं जिल्ह्यात या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा आहे. यावेळी कोणत्याही धार्मिक पद्धतीचा वापर न करता नवरा-नवरींनी एकमेकांना हार घालत वंदे मातरम या गीताचे गायन केले आणि विवाह संपन्न झाला.

…असा अनोखा विवाह सोहळा कधीही पाहिला नव्हता: धनंजय मुंडे

आपल्या आयुष्यात अनेक विवाहसोहळे आपण पाहिले, सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले, परंतु या अनोख्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहता आले हे माझे भाग्यच असल्याचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.बीड शहरापासून जवळच असलेल्या पाली येथील इन्फन्ट इंडिया (आनंदग्राम) या एचआयव्हीग्रस्त मुलांच्या संगोपन केंद्रास राष्ट्रीय महामार्गापासून जोडणाऱ्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीतून 50 लाख रुपये मंजूर केले. पावसाळा सुरू होण्याच्या आत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

आनंदग्राम संस्था शासनाकडून दुर्लक्षित राहणे हे दुर्दैवी : धनंजय मुंडे

या संस्थेचे संचालक दत्ता बारगजे आणि संध्याताई बारगजे यांनी स्व. डॉ. बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून एचआयव्हीबाधितांची सेवा करण्याचे, त्यांना सक्षम करून समाजात सन्मानाने जीवन जगण्याची संधी निर्माण करण्याचे सेवाव्रत हाती घेतले आहे. हे अत्यंत महान कार्य असून, आनंदग्राम ही संस्था आजपर्यंतच्या शासनाकडून दुर्लक्षित राहणे हे अनाकलनीय आणि दुर्दैवी असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

मी दरवर्षी या संस्थेला 5 लाख रुपयांची मदत देणार : धनंजय मुंडे

दरम्यान, एचआयव्हीबाधित दाम्पत्याच्या शिवकन्या या चिमुकलीचा पहिला वाढदिवस धनंजय मुंडे यांच्या हस्ते तिला केक भरवून साजरा करण्यात आला. या बालकांचे समाजातील स्थान अबाधित राहावे, यासाठी काम करत असलेल्या आनंदग्राम संस्थेला शासकीय स्तरावर तर मदत करण्यात येईलच. परंतु माझ्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी दरवर्षी या संस्थेला 5 लाख रुपयांची मदत देणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी यावेळी जाहीर केले.

धनंजय मुंडेंना स्व. गोपीनाथराव मुंडेंचा परिसस्पर्श: दत्ता बारगजे

आनंदग्रामच्या कामाच्या माध्यमातून मी आणि माझी पत्नी राज्यभर देणगी गोळा करण्यासाठी फिरलो, तेव्हा सामाजिक क्षेत्रातील अनेक लोकांनी मला धनंजय मुंडे यांना भेटण्याचा सल्ला दिला. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात दातृत्वाचा गुण खूप मोठा असून, त्यांना स्व. गोपीनाथराव मुंडे या लोकनेत्याच्या परिसस्पर्श झालेला आहे, असे संस्थेचे अध्यक्ष दत्ता बारगजे म्हणाले. संस्थेची स्मरणिका आणि माहितीपुस्तक देऊन बारगजे दाम्पत्याने धनंजय मुंडे यांचे स्वागत केले. यावेळी परळी न. प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, बीड जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, सूर्यभान मुंडे, नीलेश लोहिया, अविनाश नाईकवाडे, प्रा. नीलेश आघाव, शिवलिंग मोराळे यांसह आदी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने विवाह सोहळा आणि संपूर्ण कार्यक्रमादरम्यान कोविडविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन केलेले दिसून आले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.