लोखंडी अँगल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, चालक व क्लिनर जागीच ठार
या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
हिंगोली : हैदराबाद येथून मनोऱ्याचे लोखंडी अँगल घेऊन जाणारा ट्रक दातीफाटा शिवारात उलटून झालेल्या अपघातात चालक व क्लिनर दोघेही ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता.26) सकाळी दहा वाजता घडली आहे. मयत दोघेही इंदौर येथील बमोरी मोहल्ला भागातील असल्याचे आखाडा बाळापूर पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदाराबाद येथून एक ट्रक (क्र.एमपी-09-एचएफ-7344) लोखंडी एँंगल घेऊन इंदौरकडे निघाला होता. सदर ट्रक आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वारंगा फाटा ते आखाडा बाळापूर मार्गावर दातीफाटा शिवारात आला असतांना रस्त्यावरील खड्डा चुकवतांना चालकाने अचानक ब्रेक लावले. त्यामुळे ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली जाऊन उलटला. त्यामध्ये असलेले एँगल अस्ताव्यस्त झाले. या अपघातात चालक संजय मधुकर नेवले (62) व क्लिनर सोनु शंकर राव (35, दोघे रा. बमोरी मोहल्ला इंदौर) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, उपनिरीक्षक अच्युत मुपडे, जमादार शेख बाबर, नागाेराव बाभळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. सदर ट्रक मध्यप्रदेशातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.