या बैठकीला एकूण आठ नेते उपस्थित, भाजप नेत्यांचा एक फोटो; ज्याची चर्चा महाराष्ट्रात !
भाजपचे महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची घेतली भेट
मुंबई : भाजपचे महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या बैठकीला एकूण आठ नेते उपस्थित होते. सुमारे तासभर या नेत्यांमध्ये चर्चा झाली. कधी गंभीरपणे तर कधी हास्य विनोद करत यावेळी मनमोकळ्या गप्पा झाल्या. राज्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतानाच मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीतील बैठकीचे हे फोटो व्हायरल झाल्याने त्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काल शुक्रवारी 8 जानेवारी रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे काल दिल्लीला गेले होते. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी बोलावल्यामुळे हे तिन्ही नेते दिल्लीत दाखल झाले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष, शिवप्रकाश, व्ही, सतीश आणि विजय पुराणिक आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला.पहिला फोटो: गंभीर चर्चा. या बैठकीचे तीन फोटो व्हायरल झाले आहेत. पहिल्या फोटोत सर्वच नेते गंभीरपणे मंथन करताना दिसत आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला झालेले एक वर्ष, विधानपरिषद निवडणुकीतील अपयश आणि महाविकास आघाडीवरील जनतेचा वाढता विश्वास या अनुषंगाने चर्चा सुरू असल्याचे पहिल्या फोटोतील सर्वच नेत्यांच्या देहबोलीतून जाणवत आहे. या फोटोत चंद्रकांत पाटील काही तरी सांगताना दिसत आहेत. त्यावर मुनगंटीवारही बोलण्याच्या पवित्र्यात असल्याचे दिसते. तर फडणवीस यांनी हाताची घडी घालून ऐकण्याची भूमिका घेतलेली दिसते. जेपी नड्डा आणि इतर नेतेही ऐकण्याच्याच भूमिकेत असल्याचे दिसत आहे. पाटील यांच्या बाजूला बसलेल्या एका नेत्याच्या हातात कसली तरी चिठ्ठी असून त्यावरून ते नजर फिरवताना दिसत आहेत.दुसरा फोटो: खेळीमेळीचे वातावरण. दुसऱ्या फोटोतील वातावरण काहीसे हलके फुलके झालेले दिसते. या फोटोत नड्डा काही तरी सांगताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असून फडणवीस, बी. एल. संतोष आणि विजय पुराणिक हे नेते सुद्धा हसताना दिसत आहेत. नड्डा या केंद्रीय नेत्यांकडे बघून हसताना दिसत असून फडणवीस हे पाटील यांच्याकडे बघून हसत असल्याचे या फोटोतून दिसते. नड्डा यांच्या एखाद्या कोपरखळीवर सर्वच नेते हसत असावेत, असा अंदाज या फोटोतून येतो.
तिसरा फोटो : हास्य विनोद तिसऱ्या फोटोत तर केवळ तीनच नेते दिसत आहेत. जेपी नड्डा आणि भाजपचे इतर दोन केंद्रीय नेते आहेत. या फोटोत तिघेही नेते खळखळून हसताना दिसत आहेत. जेपी नड्डा यांनी मार्गदर्शन करत असताना काही तरी विनोद केला असावा, त्यामुळे तिघांच्याही चेहऱ्यावर हास्य उमटलेले दिसत आहे. त्यावरून या बैठकीत गंभीर विषयावर चर्चा झालीच, पण खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
दिल्लीतच बैठक का?
जेपी नड्डा या पूर्वीच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या तारखाही फिक्स झाल्या होत्या. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने ते मुंबईत येणार होते. परंतु, त्यांना कोरोना झाल्याने ही बैठक पुढे ढकलली. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी गेले असता, त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. त्यामुळे नड्डा यांचा महाराष्ट्रातील नियोजित दौरा रद्द झाला. आगामी काळातील त्यांचे शेड्यूल अत्यंत व्यस्त असल्याने ते मुंबईत येऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांनी पाटील, फडणवीस आणि मुनगंटीवार यांना दिल्लीत बोलावून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
काय चर्चा झाली?
या बैठकीत मुंबई आणि महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आल्याचे कालच चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्याशिवाय विधान परिषदेतील पराभवाची कारणेही नड्ड यांनी जाणून घेतली. ग्रामपंचायत निवडणुकांसाठीची तयारी, महाराष्ट्रातील आगामी पाच महापालिका निवडणुका आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने होत असलेल्या तयारीचा आढावाही घेण्यात आला. तसेच कृषी कायद्यांबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची असलेली भूमिका, या कायद्याच्या समर्थनासाठी केलेल्या कार्यक्रमांची माहितीही घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.