ए मास्क लाव रे; अजितदादांनी सरकारी कर्मचाऱ्याला सुनावले

फिरते प्रयोगशाळा वाहनाचे उद्घाटन विधान भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते

0

पुणे : कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचे नियम आणि मास्कचा आवर्जून वापर करणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवार आघाडीवर असल्याचे अनेकदा दिसले आहे. आजही पुण्यात शेतीच्या फिरत्या प्रयोगशाळेची माहिती देताना मास्क न घालणाऱ्या कर्मचाऱ्याला अजितदादांनी दम भरला.

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आज फिरते माती, पाणी, पानदेठ परीक्षण प्रयोगशाळा चारचाकी वाहनाचे उदघाटन विधान भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाकडून कशा प्रकारे परीक्षण केले जाणार आहे, याची अजित पवार माहिती घेत होते. ही प्रयोगशाळा कशाप्रकारे काम करणार, असे अजितदादांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारले. तेव्हा आपण एका कर्मचाऱ्यास इस्त्रायलमध्ये सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर अजित पवार यांनी संबंधित कर्मचाऱ्याला बोलावण्याची सूचना केली. या कर्मचाऱ्याने समोर येत सर्वांना माहिती देण्यास सुरुवात केली. परंतु, यावेळी त्याने तोंडावरचा मास्क खाली केला होता. तेव्हा अजित पवार यांनी मास्क वर घेऊन तोंडाला लावून बोल, अशी सूचना त्या कर्मचाऱ्याला केली. अजितदादांनी ‘ए मास्क वर घे आणि बोल’, असा दम देताच संबंधित कर्मचाऱ्याने मास्क वर घेऊन माहिती देण्यास सुरुवात केली. अगदी कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून अजित पवार सर्व नियम काटेकोरपणे पाळताना दिसतात. सुरुवातीच्या काळात तर अजित पवार कोरोनाच्या भीतीने प्रसारमाध्यमांशी बोलायलाही नकार देत होते. नंतरच्या काळात अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलायला तयार झाले. मात्र, माध्यमांशी बोलण्यापूर्वी चॅनेलच्या बुमवर सॅनिटायझर फवारणे असो किंवा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माईक दूर धरण्याची सूचना असो, या सगळ्यामुळे अजित पवार कायम चर्चेत राहिले होते. या काळात अजित पवार फक्त प्रसारमाध्यमे नव्हेच तर सुप्रिया सुळे, राजेश टोपे या स्वपक्षीयांपासूनही ‘दो गजकी दूरी राखताना’ दिसून आले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.