महानगरपालिका आणि भारतीय जैन संघटनेचा संयुक्त उपक्रम

मिशन झिरो उपक्रमांतर्गत शहरात २५ हजार अँटीजन टेस्ट पूर्ण

0

औरंगाबादः औरंगाबाद महानगरपालिका आणि भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मागील एकवीस दिवसांपासून सुरू असलेल्या मिशन झिरो उपक्रमांतर्गत शहरात २५ हजार अँटीजन टेस्ट पूर्ण झाल्या. त्यापैकी ८३८ जणांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. या रुग्णांना पुढील उपचारांसाठी वर्ग करण्यात आले, अशी माहिती भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ललवाणी यांनी दिली.
भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या हा उपक्रम महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडे यांच्या सहकार्याने औरंगाबादेत सुरू करण्यात आला. या उपक्रमास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आतापर्यंत २५ हजार ७१२ अँटीजन तपासण्या करता आल्या. त्यातून ८३८ सकारात्मक रुग्ण तपासून उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. त्यामुळे निश्चितच कोरोनाचा संसर्ग कमी करता आला. आपली वाटचाल मृत्यूदर शून्याकडे होत आहे. आपण कोरोनावर लवकरच मात करू, असा विश्वास श्री. ललवाणी यांनी व्यक्त केला. प्लाझ्मा डोनेशन संदर्भात माहिती देताना भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रवीण पारख यांनी सांगितले की, राज्यभरातून पाच हजार रुग्णांचे प्लाझ्मादान संमतीपत्र १५ ऑगस्टपूर्वी भरून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. औरंगाबादेत आजवर २० संमतीपत्र आले असून ५००च्या आसपास प्लाझ्मा दान संमतीपत्र पूर्ण होतील. ज्यांना प्लाझ्मा दान करावयाचे आहे. त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या समन्वयकांशी संपर्क साधावा. त्याचबरोबर सिरो सर्वे अंतर्गत अँटीबॉडी टेस्टलाही नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या सर्व उपक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, डॉ. शोभा साळवे, डॉ. श्वेता देशमुख, डॉ. अमरीन, डॉ. स्मिता अंदूरकर, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. सेवलीकर, डॉ. पठाण, डॉ. सिद्धार्थ बनसोड, भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प समन्वयक ॲड. गौतम संचेती, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रवीण पारख, पारस जैन, मराठवाडा विभागीय अध्यक्ष पारस चोरडिया, जिल्हाध्यक्ष किशोर ललवाणी, अनिल संचेती, राहुल झांबड, प्रफुल श्रीश्रीमाळ, प्रकाश कोचेटा, अमित काला, अभिजित हिरप आणि अमित भोसेकर आदी परिश्रम घेत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.