शेतात पाणी देण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण खून

डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून मृतदेह विहिरीत फेकल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे उघडकीस

0

हिंगोली  :औंढा नागनाथ जवळ पद्मावती शिवारामध्ये शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. २० )पहाटे उघडकीस आली. विहिरीच्या पाण्यावरून मयत शेतकरी रवी रुखमाजी वाठ (४२) यांचा खून झाला असावा, अशी शक्यता औंढा नागनाथ पोलिसांनी व्यक्त केली.

औंढा नागनाथ जवळ पद्मावती शिवारात शेतात पाणी देण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्याचा डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची घटना शुक्रवारी (ता. २० )पहाटे उघडकीस आली. विहिरीच्या पाण्यावरून मयत शेतकरी रवी रुखमाजी वाठ (४२) यांचा खून झाला असावा, अशी शक्यता औंढा नागनाथ पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ येथील शेतकरी रवी रुखमाजी वाठ यांचे पद्मावती शिवारामध्ये साडे आठ एकर शेत आहे. सध्या शेतामध्ये हरभऱ्याचे पीक असून गव्हाच्या पेरणीची तयारी करण्याचे काम सुरू आहे. हरभरा पिकाला पाणी देण्यासाठी तसेच गव्हाचे शेत तयार करण्यासाठी रवी वाठ हे गुरुवारी (ता. १९) रात्री अकरा वाजता एकटेच शेतात गेले होते. मात्र पहाटे पाच वाजेपर्यंत त्यांचा भ्रमणध्वनी लागत नसल्यामुळे त्यांच्या मुलांना संशय आला. त्यामुळे त्यांची मुले शेतात गेले. यावेळी त्यांनी शेतामध्ये पाहणी केली असता, विहिरीमध्ये रवी वाठ यांचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व नागरिकांच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची तपासणी केली असता, डोक्यावर वार केल्याचे आढळले. त्यांच्या डोक्यात शास्त्राचे पाच वार दिसून आले. त्यामुळे त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान या संदर्भात पोलिसांनी अधिक माहिती काढण्यास सुरुवात केली जानेवारी २०१९ मध्ये रवी वाठ व त्यांचा भाऊ यांच्यात शेतातील विहिरीच्या पाण्यावरून वाद सुरू होता. त्यावेळी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज ही देण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. त्यामुळे विहिरीच्या पाण्यावरून हा खून झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यावरून पोलिसांनी शेतकरी रवी वाठ यांच्या भावाची चौकशीची तयारी चालवली आहे. पोलिसांनी याच्या भावाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो गुरुवारीच विदर्भात गेल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी त्यास तातडीने पोलिस ठाण्यात हजर होण्याच्या सूचना दिल्या आहेत . सध्यातरी पोलिसांनी विहिरीच्या पाण्याच्या वादातून खून झाला असावा, अशी शक्यता गृहीत धरून तपास चालवला आहे मात्र संशयितांच्या चौकशीनंतरच पुढील बाब स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान मयत रवी वाठ यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.