छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक : जातीय समतोल ढासळला, भाजपाची राजकीय अवस्था बिकट
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची राजकीय कोंडी स्पष्टपणे समोर येत आहे. एकेकाळी शहरी मतदारांमध्ये प्रभाव असलेला भाजप या निवडणुकीत सामाजिक समतोल, स्थानिक नेतृत्व आणि विकासाच्या मुद्द्यांवर पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.
पूर्णतः ओबीसी नेतृत्वावरच भर :
या निवडणुकीत भाजपाने पूर्णतः ओबीसी नेतृत्वावरच भर दिल्याने शहरातील इतर प्रमुख समाजांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड आणि आमदार संजय केनेकर या ओबीसी नेत्यांकडेच संपूर्ण निवडणूक व्यवस्थापनाची सूत्रे दिल्यामुळे मराठा, दलित आणि अल्पसंख्याक समाजाला जाणीवपूर्वक डावलल्याची भावना बळावत आहे.
मराठा समाजात भाजपाविरोधात नकारात्मक वातावरण :
छत्रपती संभाजीनगरमध्ये ३५ ते ४० टक्के मराठा मतदारसंख्या असतानाही भाजपाकडून मराठा समाजाला उमेदवारी देताना सातत्याने दुजाभाव केल्याचे स्पष्ट दिसते. खुल्या जागांवरही मराठा समाजाच्या उमेदवारांना संधी न मिळणे, तसेच संघटनात्मक पातळीवर प्रभावी मराठा नेतृत्वाचा अभाव, यामुळे मराठा समाजात भाजपाविरोधात नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. समीर राजुरकर यांना आधी महापालिका निवडणूक प्रमुख करून नंतर अचानक ते पद काढून ओबीसी खासदारांकडे देणे, हा निर्णय मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरला.
आंबेडकरी चळवळीशी संबंधित मतदार दुरच :
दलित समाजाच्या बाबतीतही भाजपाची स्थिती कमकुवतच आहे. शहरात प्रभावी दलित नेतृत्वाचा चेहरा भाजपाकडे नाही. आंबेडकरी चळवळीशी संबंधित मतदार आधीपासूनच भाजपाच्या संविधानविषयक भूमिकेबाबत नाराज आहेत. त्यातच स्थानिक दलित नेतृत्व उभे न राहिल्यामुळे सामान्य आंबेडकरी मतदार तसेच उच्चशिक्षित दलित वर्ग भाजपापासून अधिक दूर जाताना दिसत आहे.
मुस्लिम मतदारसंख्या दुसऱ्या क्रमांकावर :
छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम मतदारसंख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपाची मुस्लिम समाजाविषयीची भूमिका कायमच विरोधात्मक राहिल्याने या समाजाकडून भाजपाला कोणतेही समर्थन मिळण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. परिणामी, शहरातील एक मोठा मतदारवर्ग भाजपासाठी पूर्णपणे बंद झाल्याचे चित्र आहे.
मायक्रो ओबीसी नाराज :
भाजपाच्या स्थानिक संघटन रचनेत माळी ओबीसी नेतृत्व आणि वंजारी समाजाचे वर्चस्व अधिक ठळकपणे दिसून येते. यामुळे इतर ओबीसी घटकांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे. मराठा असलेले शहराध्यक्ष किशोर शितोळे पदावर असले तरी निर्णयप्रक्रियेत त्यांना फारसे स्वातंत्र्य नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उमेदवार निवडीत मंत्री आणि खासदारांनी त्यांना विश्वासात न घेतल्याचे चित्र वारंवार समोर आले आहे. मराठा समाजातील संघटना व नेत्यांशी त्यांचा संपर्कही अत्यंत मर्यादित असल्याचे बोलले जात आहे.
प्रमुख समस्या भाजपामुळे निर्माण :
विकासाच्या मुद्द्यावर बोलायचे झाल्यास भाजपाकडे मतदारांना आकर्षित करणारा कोणताही ठोस मुद्दा दिसत नाही. शहराची सर्वात गंभीर समस्या असलेला अनियमित पाणीपुरवठा आजही सुटलेला नाही. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या काळात मंजूर झालेली समांतर पाणीपुरवठा योजना २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर बंद करण्यात आल्यामुळे शहराला मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. या निर्णयाचे दुष्परिणाम आता नागरिकांना प्रकर्षाने जाणवत असून त्याचा रोष भाजपाकडे वळताना दिसत आहे.
अंतर्गत स्पर्धा आणि मतभेद :
आमदार संजय केनेकर आणि मंत्री अतुल सावेंची भाजपा अंतर्गत मतभेद आणि राजकीय वर्चस्वासाठी सुप्त संघर्ष असल्याची चर्चा आहेच, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा उमेदवारीसाठी दोघात संघर्ष होता. केनेकर दावेदार असुन ही अतुल सावेंना उमेदवारी देण्यात अली. तीच स्पर्धा आपआपल्या वतीच्या नगरसेवकपदासाठी उमेदवारी देतांना होत असल्याची दिसत होते.
या सर्व पार्श्वभूमीवर पाहता भाजपासाठी ही निवडणूक अत्यंत अडचणीची ठरत आहे. तब्बल १९ जागांवर पक्षाला उमेदवार उभे करता न येणे ही बाबच भाजपाच्या संघटनात्मक कमजोरीचे वास्तव चित्र दाखवते.
एकूणच सामाजिक व जातीय समतोलाचा विचार केला असता, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाकडे कोणताही मोठा समाज ठामपणे उभा नसल्याचे दिसते. त्यामुळे येणारी महानगरपालिका निवडणूक ही भाजपासाठी केवळ कठीण नव्हे, तर राजकीय विश्वासार्हतेची मोठी परीक्षा ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
