अफगाणिस्तानचा पाकिस्तानला थेट इशारा: गोळीबार थांबवा, अन्यथा पाकिस्तानचे ‘तुकडे’ करू!
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आल्याने दोन्ही देशांमधील वातावरण कमालीचे तापले आहे. पाकिस्तानने पुन्हा अफगाणिस्तानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अफगाणिस्तानने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे,.
गोळीबारात चार अफगाणी नागरिकांचा मृत्यू: शुक्रवारी रात्री अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सीमेवर जोरदार संघर्ष आणि गोळीबार झाला. अफगाणिस्तानच्या दक्षिण कंदाहार प्रांतातील स्पिन बोल्डक बॉर्डर क्रॉसिंग परिसरात ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेमध्ये अफगाणिस्तानचे मोठे नुकसान झाले असून, तालिबानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात चार अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानने आरोप केला आहे की, पाकिस्तानी सैनिकांनी कोणत्याही कारण नसताना गोळीबार सुरू केला होता. या घटनेनंतर अफगाणिस्तानकडून प्रत्युत्तर म्हणून गोळीबार करण्यात आला, ज्यात काही पाकिस्तानी नागरिक देखील जखमी झाले.
पाकिस्तानला थेट धमकी: या भयंकर घटनेनंतर अफगाणी सैनिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. अफगाणिस्तानने थेट पाकिस्तानला धमकी दिली आहे. अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्डक परिसरातील एका तालिबान कमांडरने थेट पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर यांना इशारा दिला आहे.
या कमांडरने पाकिस्तानला स्पष्टपणे बजावले आहे की, “तुम्ही युद्ध सुरू केले आहे आणि त्याचे परिणाम अत्यंत भयंकर होतील”. जर पाकिस्तानने अशा प्रकारच्या घटना थांबवल्या नाहीत, तर आम्ही पाकिस्तानचे तुकडे-तुकडे करू, असा थेट इशारा या कमांडरने दिला आहे. त्याने पुढे असेही म्हटले आहे की, जर आम्ही हे काम करू शकलो नाही, तरी आमचे मुलं नक्कीच पाकिस्तानचे तुकडे करतील.
मागील तणावाचा संदर्भ: यापूर्वीही अनेकदा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणावाचे प्रसंग घडले आहेत. पाकिस्तानकडून अनेकदा हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, पण अफगाणिस्तानकडून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मात्र, आता शुक्रवारी झालेल्या चकमकीनंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानला दिलेला इशारा अत्यंत थेट आणि गंभीर आहे.
