भारताच्या दौऱ्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या खासगी आयुष्याबद्दल आणि त्यांच्या मुलींच्या गुप्त जीवनाबद्दल (Secret Life) लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावर पुतिन यांचे स्वागत केल्यानंतर, संपूर्ण जगाचे लक्ष या दोन्ही नेत्यांच्या भेटीवर केंद्रित झाले आहे. पुतिन यांचे राजकीय निर्णय आणि कार्यपद्धती जशी चर्चेत असते, त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंब आणि मुलींबद्दलचे कुतूहल लोकांना असते. पुतिन हे आपले खासगी आयुष्य अतिशय जपतात आणि गोपनीय ठेवतात, ज्यामुळे त्यांच्याबद्दल जी काही माहिती उपलब्ध होते, ती जाणून घेण्यास सगळेच उत्सुक असतात.
व्लादिमीर पुतिन यांच्या मुली कोण आहेत?
विविध माध्यमांतील माहितीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांची पहिली पत्नी ल्यूडमिला ओचेरत्नाया यांना दोन मुली आहेत.
- मारिया वोरोत्सोवा (मोठी मुलगी)
- कॅटरीना तिखोनोवा (धाकटी मुलगी)
संरक्षित बालपण आणि शिक्षण
पुतिन यांच्या या दोन्ही मुली त्यांचे बालपण लहानपणापासूनच कडक संरक्षणाखाली जगत होत्या. त्यामुळे, त्यांना सार्वजनिक जीवनात फारसे येता आले नाही किंवा त्या कधीही उघडपणे शाळेत जाऊ शकल्या नाहीत. एवढेच नाही, तर विद्यापीठात प्रवेश घेताना देखील त्यांनी खोट्या नावांचा वापर केला होता. पुतिन यांनी स्वतः स्पष्ट केले आहे की, त्यांच्या दोघी मुलींचे शिक्षण रशियामध्येच झाले आहे आणि त्या मॉस्कोमध्ये राहतात. त्यांचे संपूर्ण बालपण अंगरक्षक आणि सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातच गेले. पुतिन यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की त्यांना नातवंडं आहेत, पण त्यांनी सामान्य जीवन जगावे अशी त्यांची इच्छा आहे.
मोठी मुलगी मारिया वोरोत्सोवाचे करिअर
पुतिन यांची मोठी मुलगी मारिया हिने मेडिसिन (एमबीबीएस) मध्ये पदवी मिळवली आहे. ती वैद्यकीय संशोधनात तज्ज्ञ आहे. अनेक महत्त्वाच्या आरोग्यसेवा प्रकल्पांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधन गटांमध्ये तिचा सहभाग असतो. रॉयटर्सच्या अहवालानुसार, मारिया ही एक अब्जाधीश व्यावसायिक महिला (बिझनेसवुमन) आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात, जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी ती फील्ड हॉस्पिटलमध्ये जाताना दिसली होती. मारिया विवाहित असून तिला मुलेही आहेत. ती सार्वजनिक जीवनापासून दूर राहून शांत आणि साधे जीवन जगणे पसंत करते.
धाकटी मुलगी कॅटरीना तिखोनोवाचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व
पुतिन यांची धाकटी मुलगी कॅटरिना तिखोनोवा हे एक अतिशय वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. नृत्याच्या क्षेत्रात तिची विशेष ओळख आहे; ती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेली ‘रॉक-एन-रोल’ नृत्यांगना आहे आणि तिने अनेक जागतिक नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. नृत्याव्यतिरिक्त, कॅटरिनाने विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात आपले करिअर केले आहे. ती रशियातील मोठ्या रिसर्च आणि हाय-टेक युनिव्हर्सिटीजचे नेतृत्व करते. कॅटरिना रशियामध्ये तंत्रज्ञान-नाविन्य (टेक-इनोव्हेशन) प्रकल्पांना प्रोत्साहन देते आणि अनेक सरकारी संशोधन कार्यक्रमांमध्ये सहभागी असते. कॅटरिनाचे लग्न झाले असून तिला मुले आहेत, मात्र ती तिचे सामाजिक जीवन अत्यंत खासगी (प्रायव्हेट) ठेवते.
तिसऱ्या मुलीबद्दलचा दावा
अनेक माध्यमांच्या रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जातो की पुतिन यांना एलिजावेटा ओलेगोवना नावाची आणखी एक (तिसरी) मुलगी आहे. तिला पुतिन यांची ‘सीक्रेट लेक’ (गुप्त कन्या) असेही म्हटले जाते. ही २२ वर्षीय एलिजावेटा ओलेगोवना पॅरिसमध्ये राहत असल्याचे बोलले जाते. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर तिने आपले सोशल मीडिया अकाउंट बंद केले, असा दावा केला जातो. मात्र, पुतिन यांनी या तिसऱ्या मुलीबद्दलच्या दाव्याची कधीही अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.
