अमरावती जिल्ह्यात पुन्हा 7 दिवसांची संचारबंदी; तीन शहरे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित

या तिन्ही शहरात 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ तशीच राहणार

0

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात 7 दिवस संचारबंदी वाढवली. अमरावती, अचलपूर, अंजनगाव सूर्जी शहर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. या तिन्ही शहरांत 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ तशीच राहणार आहे. तसेच नंतरची स्थिती पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले.

अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी होता लॉकडाऊन

तत्पूर्वी अमरावतीत 22 फेब्रुवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी होता. लॉकडाऊनची मुदत 1 मार्चला सकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे राज्यात अनलॉकनंतर पुकारला गेलेला पहिलाच लॉकडाऊन होता. मात्र आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊन नंतरही जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही. त्यामुळे अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली.

12 कंटेन्मेंट झोन घोषित

अमरावतीची परिस्थिती पाहता, अमरावती महापालिकेने आधीच अमरावती शहरात 12 कंटेन्मेंट झोन घोषित केले. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसांपर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिले. तर या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले. या 12 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वांत जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता.

लॉकडाऊनमुळे बससेवा देखील बंद

अमरावतीमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे बससेवादेखील बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. अमरावती हे विभागाचे ठिकाण असून या ठिकाणी नागपूर, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, औरंगाबादसह इतर जिल्ह्यांत बससेवा सुरु राहतात. मात्र, इतर जिल्ह्यांतील एसटी सेवा बंद असल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. बाहेर  जाणारे अनेक प्रवासी बसस्थानकामध्ये थांबलेले आहेत. लॉकडाऊन असल्याने बससेवा बंद आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.