पोलिस कार्यालयात 50 टक्के हजेरी, इतरांना वर्क फ्रॉम होम, पोलिस महासंचालकांचे आदेश
कोरोनाचा वाढचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयीन उपस्थितीविषयी सूचना जारी
मुंबई : कोरोना पुन्हा डोके वर काढण्याच्या शक्यतेमुळे पोलिस कार्यालय 50 टक्के हजेरीवर सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अपर पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी हे आदेश जारी केले आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचे नियोजन करण्यात आले आहे.
कोणाची उपस्थिती किती?
कोरोनाचा वाढचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयीन उपस्थितीविषयी सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गट अ आणि ब श्रेणीतील पोलिस अधिकाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती एकूण पदसंख्येच्या 100 टक्के राहील, असे नमूद करण्यात आले आहे.
क आणि ड श्रेणीसाठी 50 टक्के उपस्थिती
गट क आणि ड श्रेणीतील पोलिस कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती एकूण पदसंख्येच्या 50 टक्के राहील. त्यापैकी 25 टक्के कर्मचारी सकाळी 9 ते 4 या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहतील, तर उर्वरित 25 टक्के कर्मचारी सकाळी 11 ते 5 या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहतील. कोणत्या कर्मचाऱ्यांनी कोणत्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहायचे आहे, याबाबतचा निर्णय संबंधित उपसहाय्यक घेतील.
वर्क फ्रॉम होम
गट क आणि ड श्रेणीतील उर्वरित पोलिस कर्मचारी हे वर्क फ्रॉम होम करतील. तात्काळ सेवेसाठी फोनवर उपलब्ध असतील. ज्यावेळी कार्यालयीन कामकाजासाठी कार्यालयात तातडीची आवश्यकता असेल, त्यावेळी तत्कालीन परिस्थितीनुसार संबंधित उपसहाय्यक जास्त कर्मचाऱ्यांना (गट क आणि ड श्रेणी) कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी बोलावू शकतात.
हेमंत नगराळेंकडूनही सतर्कतेचा इशारा
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. दररोज 6 हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनीही कोरोनाविरोधातील लढाईची घोषणा केली आहे. वर्षभर कोरोनाच्या विरोधात लढलो. आता विश्रांतीनंतर पुन्हा एकदा युद्ध करण्याचे दिवस आले आहेत, अशा शब्दात पोलिस महासंचालकांनी संपूर्ण पोलिस यंत्रणेला सतर्क केले आहे.
पोलिसांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र
रेल्वे सेवा सुरू झाल्याने काही प्रमाणात केसेस वाढतील, असे वाटलं होते. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी शक्यता वाटली नव्हती, असे पोलिस महासंचालक म्हणाले. नवी मुंबई आणि कोकण परिक्षेत्रात कोरोना काळात शहीद झालेल्या 83 पोलिस जवानांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती पत्रक देण्यात आले. पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र दिले गेले.