औरंगाबादेतील शरद पवार यांच्या सभेला अखेर परवानगी, ‘हल्लाबोल मोर्चा’चा आज समारोप
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या औरंगाबाद येथील आजच्या (3 फेब्रुवारी) नियोजित सभेला पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. शुक्रवारी (2 फेब्रुवारी) रात्री 1 वाजेच्या सुमारास पोलिसांनी सभेला परवानगी असून आज दुपारी हे सभा होणार आहे.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीने मराठवाड्यात केलेल्या ‘हल्लाबोल मोर्चा’चा समारोप आज औरंगाबाद शहरात होणार आहे. मात्र या मोर्चाला परवानगी असली तरी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर स्टेज उभारण्यास मंजुरी देण्यात आली नव्हती. या मंजुरीसाठी औरंगाबाद महानगर पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने बरीच धावपळ केली.
अखेर शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर स्टेज उभारण्यास परवानगी दिली. शनिवारी होणाऱ्या सभेपूर्वी सकाळी 11 वाजता क्रांतीचौक ते मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयपर्यंत मोर्चा काढला आहे. त्यानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन दिले जाईल. त्यानंतर शरद पवार यांच्या सभेने दुपारी 2 वाजता ‘हल्लाबोल मोर्चा’च्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप होणार आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेधनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांसह राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील सर्व आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.