नांदेडमध्ये 22 शिक्षकांना कोरोनाची बाधा, विद्यार्थी पालकांत भीतीचे वातावरण

जिल्ह्यात शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने उडाली खळबळ

0

नांदेड : जिल्ह्यात 22 शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत 5 हजार 242 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यापैकी 22 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे. नववी ते बारावी शाळा सुरु होत आहेत. त्याचदरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

उद्यापासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून 9 वी ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 18 ठिकाणी कोव्हिड तपासणी केंद्र तयार करण्यात आले आहेत. 858 माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांची अँटीजेन आणि आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. एकूण 8 हजार 115 शिक्षकांची तपासणी होणार आहे. 45 वर्षांखालील 4हजार 398 शिक्षकांची अँटीजेन टेस्ट तर 45 वर्षावरील 3 हजार 717 शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. आणखी दोन दिवसांत उर्वरित शिक्षकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी कुंडगीर यांनी दिली. नांदेडमध्ये नववी ते बारावी दरम्यान शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख 89 हजार 532 इतकी आहे. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसून दिवाळी व इतर सणात नागरिकांची बाजारपेठेतील गर्दी आणि कोरोना नियमाचे उल्लंघन कोरोनाला आमंत्रण देणारे ठरत आहे. राज्य सरकारने शाळा सुरु करताना कोरोना सुरक्षा नियमांची यादी तयार केली असली तरी सर्व नियम कागदावरच असल्याचे मंदिर, प्रार्थनास्थळे उघडल्यानंतर समोर आले होते. 9 वी ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू करताना विद्यार्थी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक आहे. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येणार आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकांच्या लेखी संमतीवर अवलंबून आहे. पूर्ण उपस्थितीबाबतची पारितोषिक बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास पालक व विद्यार्थी यांचा कितपत प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.