Ajit Pawar Vs Supriya Sule | बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारानिमित्त इंदापूर येथील निमगाव केतकी येथे सभा झाली.सभेला अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे, यशवंत माने, प्रवीण माने, अंकिता पाटील-ठाकरे या वेळी उपस्थित होते.
सभेला संबोधित करताना, अजित पवार म्हणाले,‘इंदापूर, दौंडमधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. आता कोणी कितीही भावनिक होऊन डोळ्यांमध्ये अश्रू आणले तरी शेतीला पाणी येणार नाही. भावनिक होऊ नका, अंगात पाणी असणाराच माणूस पाणी आणू शकतो. आम्हाला तुमच्या शिवारात पाणी आणायचे आहे, असे अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, की शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले. १९७८ मध्ये येथील बारमाही शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे ठरले होते. येथील लोकांनी हत्तीवरून साखर वाटत मिरवणूक काढली. या गोष्टीला ४५ वर्षे झाली, तरीही आज येथील लोक पाणी-पाणी करत आहेत.
‘आपला खासदार मोदींच्या विचाराचा असेल, तर येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. गरज पडली, तर पंतप्रधान मोदींपर्यंत जाऊन येथील बारमाही पाण्याचा प्रश्न सोडवू, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
‘मस्ती कशी जिरवायची, हे मला ठाऊक’ – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘जिल्हा बँकेतील पदाधिकारी, कर्मचाऱ्यांना दमबाजी केली जात आहे. माझ्या लोकांना जर दमबाजी केली, तर त्यांची मस्ती कशी जिरवायची हे मला माहिती आहे. मी बँकेत संचालक नसलो, तरी माझे बँकेत ऐकले जाते. माझी बदली होईल, असे कुणाला घाबरून वाटत असेल, तर हा भ्रम लोकांनी मनातून काढून टाकावा. एक तर मी कुणाच्या नादी लागत नाही. नादी लागलो, तर त्याला सोडत नाही. माझ्या लोकांना जर दमदाटी झाली, तर ती मस्ती कशी जिरवायची त्याचा बंदोबस्त मनात आणल्यास लोक करू शकतात, मी नाही.’