2020 चा ‘अनंत भालेराव स्मृती’ पुरस्कार हिमरू तज्ज्ञ अहमद कुरेशी यांना जाहीर

भालेराव यांच्या पुण्यतिथी दिनी पुरस्कार प्रदान करणार - प्रतिष्ठानच्या कार्यवाह डॉ. सविता पानट

0

औरंगाबाद  : निर्भीड व धडाडीचे पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक अनंत भालेराव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा अनंत भालेराव स्मृती पुरस्कारासाठी यंदा हिमरू नक्षीकामाचे आधुनिक प्रणेते अहमद कुरेशी यांना जाहिर झाला आहे. 26 ऑक्टोबर रोजी भालेराव यांच्या पुण्यतिथी दिवशी हा पुरस्कार छोट्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या कार्यवाह डॉ. सविता पानट यांनी  दिली .

दरवर्षी पत्रकारिता, साहित्य, कला, समाजसेवा अशा विविध क्षेत्रातील एका नामवंत व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. पहिलाच पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांना देण्यात आला होता. आतापर्यंत कुमार केतकर, अरूण टिकेकर, पी. साईनाथ हे ज्येष्ठ पत्रकार; विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार यांच्यासारखे नाटककार; मंगेश पाडगांवकर, ना.धो. महानोर यांसारखे प्रतिभावंत कवी, डॉ. सुधीर रसाळांसारखे व्यासंगी समिक्षक, ग.प्र.प्रधान, मृणाल गोरे, मेधा पाटकर, अभय बंग, पुष्पा भावे, थोर गांधीवादी गंगाप्रसादजी अग्रवाल, नरेंद्र दाभोळकर ही सामाजिक राजकीय क्षेत्रातील मोठी माणसे, अनिल अवचट, हार्मोनिअम वादक अप्पा जळगांवकर, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, शिक्षणतज्ज्ञ द.ना.धनागरे, चित्रपट नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, यांच्यासारख्या महनिय व्यक्तिमत्वांना या पुरस्काराने गौरविले आहे.

यंदा हिमरू वस्त्रांवर विणल्या जाणाऱ्या नक्षीकामांतील आधुकनिक काळातील तज्ज्ञ अहमद सईद कुरेशी यांना दिला जाणार आहे. ५० हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ७८ वर्षांचे अहमद कुरेशी यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासूनच या क्षेत्रात काम करायला सुरवात केली. हिमरू नक्षीबाबत त्यांना विशेष आकर्षण निर्माण झाले. त्या काळी अतिशय मोजक्याच नक्षींचा वापर हिमरूकामात केल्या जात होता. अहमद कुरेशी यांनी विविश प्रकारच्या नक्षींचे आरेखन करून त्यांचा वापर करण्यासाठी वीणकरांना प्रोत्साहन दिले. पारंपरिक शैलीचा गाढ अभ्यास करून नविन नक्षी त्यांनी तयार केली. अजिंठा लेण्यांतील कमळचित्रांना त्यांनी पहिल्यांदा हिमरूत आणून ही ही कलात्मक शैली लोकप्रिय केली. आत्तापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केल्या गेले आहे. नविन नविन नक्षीकाम तरूण वीणकर स्त्री पुरूषांना शिकविण्यासाठी अहमद कुरेशी सदैव आग्रही राहिलेले आहेत.

अहमद कुरेशी यांची निवड अनंत भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकरराव मुळे, कोषाध्यक्ष डॉ. प्रभाकर पानट, सचिव डॉ. सविता पानट, सदस्य डॉ. सुधीर रसाळ, न्यायमुर्ती नरेंद्र चपळगांवकर, प्राचार्य प्रताप बोराडे, अरूण भालेराव, डॉ. सुनीती धारवाडकर, अशोक भालेराव, प्रा. विजय दिवाण, पत्रकार सुभाषचंद्र वाघोलीकर, संजीव कुलकर्णी, श्याम देशपांडे, बी.एन.राठी, श्रीकांत उमरीकर, मंगेश पानट यांनी एकमताने केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.