बुलडाण्यात एकाच गावातील 155 जणांना कोरोनाची लागण; धार्मिक कार्यक्रमातून संसर्ग?
155 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे झाडेगावला कन्टेन्मेंट झोन जाहीर
बुलडाणा :राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातल्याची घोषणा केली होती.
बुलडाण्यातील एका गावातील सध्याची परिस्थिती पाहता ही गोष्ट किती महत्त्वाची आहे, हे दिसून येते. कारण, या गावात धार्मिक कार्यक्रमामुळे 155 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथे हा प्रकार घडला. झाडेगावात सात दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याचे सांगितले जाते. सध्या स्थानिक प्रशासनाकडून गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना कसा पसरला, याचा शोध घेतला जात आहे.
झाडेगाव कन्टेन्मेंट झोन, प्रशासनाची धावाधाव
155 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे झाडेगावला आता कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. एकाचवेळी इतक्या लोकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासन हादरले आहे. गावात आरोग्य, पोलिस आणि महसूल कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीचा कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
बाहेरच्या लोकांमुळे गावात कोरोना?
झाडेगावची लोकसंख्या दोन हजार इतकी आहे. सात दिवसांपूर्वी गावात आयोजित करण्यात आलेल्या धार्मिका कार्यक्रमासाठी बाहेरून काही लोक आले होते. कार्यक्रमाच्यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्याचा नियम गुंडाळून ठेवला गेला. या निष्काळजीपणामुळेच गावातील इतक्या लोकांना कोरोनाची लागण झाली. ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6 हजार नवे रुग्ण
राज्यात कोरोना संसर्गाने नव्याने डोके वर काढले आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांत कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. आजसुद्धा (23 फेब्रुवारी) कोरोनाग्रस्तांची संख्या हजारोंनी वाढली असून कालच्या तुलनेत आज 1000 नव्या रुग्णांची भर पडली आहे. म्हणजेच कालच्या तुलनेत कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे. राज्यासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे 6218 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तसेच, 5869 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.96 टक्क्यांवर आहे. तर दिवसभरात 51 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.45 टक्क्यांवर आहे. अशाच प्रकारे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली, तर आगामी काळात हा मृत्यूदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 लाख 12 हजार 312 वर पोहोचला आहे. काल राज्यात 5 हजार 210 कोरोनारुग्णांची नोंद झाली होती. तर काल दिवसभरात 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.