सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी 20 जानेवारीला शिक्षा सुनावणार
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक सत्र न्यायालय 20 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे. आज दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण झाला. आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायलयाकडे केली.
1 जानेवारी 2013 रोजी अहमदनगर मधील सोनई गावात प्रेमप्रकरणातून 3 जणांची हत्या करण्यात आली होती. या खटल्यातही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते, केवळ परिस्थितीजन्य पुराव्यानुसार हा खटला सरकारी वकिलांनी चालविला होता. सचिन सोहनलाल घारु (वय 23), संदीप राजू धनवार (वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26) हे तिघेही गणेशवाडी, सोनई, तालुका नेवासा येथिल रहिवासी होते. यांची सोनई गावात प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सचिन घारु या तरुणाचे सवर्ण मुलीवर प्रेम होते. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता मात्र सवर्णच्या कुटुंबाने कट रचून 1 जानेवारी 2013 रोजी सचिनची हत्या केली. नेवासे फाटा इथल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये सचिन व त्याचे मित्र संदीप राजू धनवार आणि राहुल कंडारे हे तिघे कामाला होते. स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे, असे सांगून त्यांना विठ्ठलवाडीला बोलावण्यात आले. यावेळी त्यांनी सचिनची हत्या केली. सचिनच्या हत्येनंतर त्याचे मित्र संदीप राजू धनवार आणि राहुल कंडारे यांचीही हत्या केली होती. इतकेच नाही तर सचिनच्या मृतदेहाचे तुकडे करुन कूपननलिकेत टाकले होते. तर आरोपींनी संदीप धनवार आणि राहुल कंडारे यांचे मृतदेह कोरड्या विहिरीत पुरले होते. याप्रकरणी पोलिसांनी प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक फलके, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना अटक केली होती.
याप्रकरणी सीआयडीने 7 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यापैकी 6 जणांना न्यायालयाने खुनाच्या आरोपाखाली दोषी धरले असून अशोक फलकेची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.