सलमानच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी, आजची रात्रही तुरुंगातच

0

काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानच्या जामीन अर्जावर आज म्हणजे शुक्रवारी सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र सलमानला आणखी एक दिवस तुरुंगातच काढावा लागणार असल्याचे दिसते. कारण त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु झाल्यानंतर न्यायाधीश रविंद्रकुमार यांनी सांगितले, की सर्व रेकॉर्ड पाहता यावर उद्या सुनावणी केली जाईल. त्यामुळे सलमानला आजची रात्रदेखील तुरुंगातच काढावी लागणार आहे. मात्र त्याचे सहकारी सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम यांना कोर्टाने गुरुवारी निर्दोष ठरवून त्यांची सुटका केली आहे.

कोर्टात जाण्यापूर्वी सलमानचे वकिल महेश बोरा यांनी माध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले होते, आज सलमानला जामीन मिळेल, असे विश्वास वाटतोय. मात्र सुनावणी पूर्ण न झाल्याने त्याला आजची रात्र तुरुंगात काढावी लागणार आहे. ते म्हणाले होते, काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल 20 वर्षांनंतर लागला, हा काळ एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नाहीये. सलमानची केस लढू नये यासाठी मेसेज आणि फोनद्वारे धमक्या मिळत असल्याचा आरोपही वकिल महेश बोरा यांनी केला आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवर विश्वास नसल्याचेही ते म्हणाले. सलमानचे वकिल महेश बोरा त्याला सकाळी भेटले. दोघांमध्ये जामीनासंदर्भात बातचीत झाली होती.

कोर्टाने 5 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर सलमानची रवानगी जोधपूरच्या तुरुंगात करण्यात आली. त्याला कैदी नं 106 देण्यात आला. तसेच तुरुंगात गेल्यानंतर त्याने संपूर्ण रात्र चार चादरीवर काढली. त्याने तुरुंगातील जेवण आणि कपडेही नाकारले होते. सुरुवातीला सलमानचा रक्तदाब वाढला होता, मात्र आता तो स्वस्थ आहे.

काय आहे प्रकरण?
जोधपूरमध्ये ऑक्टोबर 1998मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. सलमान खान, सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे शूटिंगसाठी जोधपूरमध्ये होते. जोधपूर जवळ असलेल्या कांकाणी गावात 2 काळवीटांची शिकार केल्याचा आरोप यांच्यावर लावण्यात आला. बिष्णोई समाजाच्या तक्रारीनंतर कलाकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 10 ऑक्टोबर 1998 रोजी अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम यांना अटक करून त्वरीत जामीन दिला. तसेच 12 ऑक्टोबर 1998मध्ये अभिनेता सैफ अली खानला अटकपूर्व जामीन मिळाला. सलमान खानला जयपूरमधील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून एअर रायफल आणि बंदुकीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. 14 ऑक्टोबर 1998 मध्ये सलमानला जामीन मंजूर झाला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.