सचिन तेंडुलकरच्या कन्येला लग्नाची मागणी घालणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरची कन्या सारा हिला लग्नाची मागणी घालुन वारंवार गैरवर्तन केल्या प्रकरणी पश्चिम बंगालमधील एका तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. तो तरुण मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.
लग्नाला नकार दिल्यास अपहरण करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाचे नाव देवकुमार मेट्टी (३२) असे असून रविवारी (७ जानेवारी) त्याला वांद्रेतून मुंबईत आणण्यात आले. महिन्याभरापासून तब्बल २० पेक्षा जास्तवेळा तेंडुलकरच्या घरी फोन करून तो त्रास देत होता. अखेर सचिनने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. साराला एकदा टीव्हीवर पाहिल्यानंतर तिच्या प्रेमात पडल्याची देवकुमार मेट्टी याने सांगितले. देवकुमारचे मानसिक संतुलन बिघडल्याचे त्याचे शेजारी व नातेवाइकांनी सांगितले आहे. या माहितीनुसार त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प. बंगाल येथील मिडीनपोरमधील माहिशदल परिसरात राहाणारा देवकुमार हा सचिनच्या वांद्रे येथील निवासस्थानी फोन करून सारा तेंडुलकर हिला लग्नासाठी मागणी घालत होता. ‘जर तू नकार दिलास, तर तुझे अपहरण करीन,’ असे तो फोनवरून धमकावत होता. सुरुवातीला तेंडुलकर कुटुंबीयांनी या फोनकडे दुर्लक्ष केले. मात्र, वारंवार फोन येत असल्याने, अखेर त्यांनी वांद्रे पोलिसांकडे तक्रार नोंदविली. देवकुमारने अखेरचा फोन २ डिसेंबरला केला होता. त्यांनतर सारा तेंडुलकरने लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कॉल रेकार्ड तपासल्यानंतर हे फोन पश्चिम बंगालमधील मिडीनपोर या जिल्ह्यातून येत असल्याचे समोर आले. त्या ठिकाणी पथक पाठवून देवकुमारला शनिवारी (६ जानेवारी) अटक केली.
देवकुमारने महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडले असून, तो बेरोजगार आहे. त्याच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. देवकुमारच्या डायरीत पोलिसांना सारा तेंडुलकरचे फोटो सापडले आहेत.