शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या महावितरणाच्या तीन अधिकाऱ्यांना अटक
शेतकऱ्यांकडून 1 लाख रुपयांची लाच घेताना महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यासह 2 जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही घटना तुळजापूर जिल्ह्यातील होर्टी येथे घडली. शेतातील विजेचा डीपी दुरुस्त करून बसविण्यासाठी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांनी शेतकऱ्याला 1 लाख रुपयांची लाच मागितली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणचा सहाय्यक अभियंता सुधीर बुरनापल्ले, वरिष्ठ तंत्रज्ञ सरदार खान पठाण व खासगी इलेक्ट्रिकल गुत्तेदार पांडुरंग जाधव या तिघांना अटक केली आहे.
होर्टी गावात एका द्राक्षाचे उत्पन घेणाऱ्या शेतकऱ्याची रोहित्र नादुरुस्त असल्याने मागील 6 महिन्यांपासून विहीर बंद होती. यामुळे द्राक्ष पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे या शेतकऱ्याने रोहित्र दुरुस्त करून देण्याची मागणी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र शेतकऱ्याला दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या तिघांना अटक केली.