रिक्षाचालकांच्या मुजोरीचा हिंगोलीच्या डीवायएसपी सुजाता पाटील यांना अनुभव
रिक्षाचालकांची मुजोरी सर्वसामान्यांना सहन करावी लागतेच, परंतु आता पोलिसांनाही याचा अनुभव यायला लागला आहे. हिंगोलीच्या डीवायएसपी सुजाता पाटील यांना रविवारी रिक्षाचालकांच्या मुजोरीचा अनुभव आला. त्यांनी आपली खरी ओळख दाखवली नाही म्हणून त्यांना रिक्षाचालक प्रवाशांसोबत कसे वागतात, याची प्रचिती आली.
रिक्षाचालक महिला प्रवाशांचा अपमान कसे करतात, पोलिस समोर असूनही रिक्षाचालक प्रवाशांसोबत कसे वागतात, हेच त्यांना पाहायचे होते, म्हणून त्यांनी आपली ओळख लपवून हा अनुभव घेतला. परंतु रिक्षाचालकांना मुजोरीपणाचा त्यांना फटका बसला. त्यांचा अपमानदेखील करण्यात आला. या अनुभवाचे वर्णन त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून केले.
सुजाता पाटील यांची फेसबुक पोस्ट…
सुजाता पाटील म्हणाल्या, ‘सकाळी 15 तास प्रवास करून भोपाळ ते मुंबईला आले. प्रवासाने थकलेले होते. त्यात पंजाब मेल 3 तास उशीरा होती. मुलगी आजारी असल्याने जीव कासावीस होत होता. मी बॅगा घेऊन अंधेरीला गेले. अंधेरीला नेहमीच रिक्षावाले प्रवाशांचा छळ करत असतात. पोलिसही काही अंतरावर खुर्च्या टाकून बसलेले असतात. मात्र याकडे कुणी लक्ष देतच नाही. मी माझी ओळख न सांगता प्रवास करायचे ठरवले. मी जवळ असलेल्या पोलिस चौकीत जाऊन मदत मागितली. मात्र तिथे असलेल्या पोलिस शिपायांनी माझा भरभरून अपमान केला. मला काहीवेळ स्तब्ध झाले. एका प्रवाशी महिलेचा अपमान कशाप्रकारे केला जाऊ शकतो, याचा आज अनुभव आला. माझे डोळे पाणावले. महिला कधी सुरक्षित होतील?’