राहुल फटांगडे हत्येप्रकरणी तिघांना नगरमधून अटक
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दगडफेकीत राहुल फटांगडे या तरूणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तिघांना अहमदनगर जिल्ह्यातून पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना शिक्रापूर न्यायालयाने १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींची नावे पोलिसांनी उघड केलेली नाहीत.
एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे दगडफेक झाली होती. त्यात राहुल बाबाजी फटांगडे (वय २८) याला जमावाने मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घातल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
भीमा कोरेगाव दंगलीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यातील काही अधिकृत व्हिडिओ पोलिसांकडे आहेत. त्यावरून पोलिस दंगलखोरांचा शोध घेत आहेत. बुधवारी (१० जानेवारी) पोलिसांनी आठ जणांना अटक केली. आतापर्यंत याप्रकरणात एकुण ५१ जणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
फटांगडे खून प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी ग्रामीण पोलिसांचे पथक नगर जिल्ह्यात गेले होते. तेथून तीन आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून तिघांनीही गुन्ह्यांची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर राहुल फटांगडेच्या कुटुंबाला अनेक संघटनांकडून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर फटांगडे कुटुंबीयांना राज्य सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत देण्यात आली.